Loksabha Elections : देशात १३ किंवा १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, तर २० एप्रिलला महाराष्ट्रात मतदान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यांत ही निवडणूक होण्याचा अंदाज आहे.
हे पाहता लोकसभा निवडणुकीत आजपासून मतदानासाठी फक्त ४५ दिवस बाकी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिल्या.
राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणकीच्या तयारीसाठी मंगळवारपासून मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यास सुरुवात झाली. यामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पटेल यांनी हे सूतोवाच केले.
या आढावा बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी खासदार आनंद परांजपे आदी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाची ताकद असलेल्या राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांचा दोन दिवस आढावा घेतला जात आहे. पहिल्या दिवशी मंगळवारी गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड़ या सात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला,
तर बुधवारी कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर (दक्षिण), गडचिरोली या नऊ मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.
राष्ट्रवादीकडून महायुतीच्या जागावाटपात या १६ पैकी १३ जागांसाठी आग्रह धरला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मंगळवारच्या बैठकीत मार्गदर्शन करताना नेत्यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी पटेल यांनी देशात १३ किंवा १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, तर २० एप्रिलपासून मतदानास सुरुवात होऊन दोन टप्यांत मतदान होईल, असा अंदाज पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला.