विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी! ‘या’ जागांवर आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उतरवलेत

Published on -

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती पुन्हा एकमेकांच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीने आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार उतरवले आहेत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट समाविष्ट असून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट समाविष्ट आहेत.

मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठी बिघाडी पाहायला मिळाली आहे. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी मधील तिन्ही घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात आपले उमेदवार उतरवले असल्याने महाविकास आघाडी मधीलच घटक पक्ष आता एकमेकांच्या विरोधात कटकारस्थान रचताना दिसणार आहेत.

या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी मधील तिन्ही घटक पक्षांमध्ये मतभेद आहेत हे यावरून अधोरेखित होते. मात्र सर्वाधिक मतभेद हे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात आहेत. महाविकास आघाडीत आपल्या घटक पक्षांना सोडलेल्या जागांवर देखील आघाडीतील दुसऱ्या घटक पक्षांनी उमेदवार दिले असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

या निमित्ताने ज्याप्रमाणे काँग्रेसने लोकसभा मतदारसंघात सांगली पॅटर्न अवलंबला होता तसाच पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही अंगीकारला आहे अशा चर्चा राजकीय विश्लेषकांकडून सुरू आहेत. दरम्यान आता आपण महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी कोणत्या जागांवर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उतरवले आहेत याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

या जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात

महाविकास आघाडीने राज्यातील मिरज, दिग्रस, दक्षिण सोलापूर आणि परांडा या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. दिग्रस विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात ठाकरे गटाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिली. मिरज विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या तानाजी सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसने मोहन वानखडे यांना तिकीट दिलय.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्या विरोधात काँग्रेस कडून दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परांडा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे रणजीत पाटील यांचे विरोधात राहुल मोटे यांना तिकीट देण्यात आले आहे. अर्थातच या जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवारच एकमेकांना पाडण्यासाठी कट कारस्थान करताना दिसतील.

दुसरीकडे भायखळा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे मधु अण्णा चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तसेच नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही संजय राऊत यांनी विकली असल्याचा आरोप त्यांच्याच पक्षातील शिवसैनिकांच्या माध्यमातून होऊ लागला आहे.

तर काही ठिकाणी काँग्रेसने उतरवलेल्या उमेदवारांच्या विरोधात स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला असून यामुळे पक्षाला काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागले आहेत. ठाकरे गटाकडून आपल्या पहिल्या यादीत काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली असल्याने ती सुधारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.

यावरून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात मतभेद असल्याचे स्पष्ट होते. याशिवाय महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करताना काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट हे तीन पक्ष सोडले असता इतर मित्र पक्षांचा साधा विचारही करण्यात आलेला नाही. यामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष स्वबळावर महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरत आहेत. समाजवादी पक्षाने मालेगाव मध्य आणि धुळे शहर मतदारसंघात आपला उमेदवार उतरवला आहे.

शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यातील उरण, नांदेड जिल्ह्यातील लोहा, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी मजबूत स्थितीत आहे मात्र आघाडी मधील मोठ्या पक्षांनी शेतकरी कामगार पक्षाला साधी एक जागा सुद्धा सोडली नाही. यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी ही जगजाहीर असून आघाडी मधीलच हा मतभेद विधानसभा निवडणुकीत त्यांना जड जाणार असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील या विधानसभा निवडणुकीत 23 तारखेला जनता जनार्दन कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe