Maharashtra Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
राज्यातील सर्व पक्ष सध्या निवडणुकीच्या कामाला लागले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाने शिवसेना जनसंवाद दौरा सुरू केला आहे.
आज शिवसेनेची हा जनसंवाद दौरा रिसोड आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघात होता. या दौऱ्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रिसोड आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांसोबत संवाद साधला आहे.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी, ‘सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी कायमच पुढाकार घेऊन काम करणारी संघटना म्हणजे आपली शिवसेना. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारसरणीवर काम करण्याची प्रेरणा आपल्या सर्वांना वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दिली आहे.
याच पद्धतीने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब राज्यभरात शिवसेना पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना आता त्यांची ताकद होऊन आगामी विधानसभा निवडणुकीत महाविजय प्राप्त करायचा आहे,’ असे म्हणतं श्रीकांत शिंदे यांनी येथील शिवसैनिकांना आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले आहे.
या जनसंवाद दौऱ्यादरम्यान खासदार शिंदे यांचे अकोला येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत झाले. शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदे यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले आणि शिंदे यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या माता – भगिनींशी संवाद साधला.
यावेळी श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी योजना यांसह महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.
दरम्यान शिंदे यांनी, ‘आपल्या सर्व शिवसैनिकांना नागरिकांचा हा आपल्यावरचा विश्वास सार्थकी लावायचा असून शासनाच्या अधिकाधिक योजनांचा त्यांना लाभ मिळवून द्यायचा आहे, असे आवाहन यावेळी सर्व शिवसैनिकांना केले आहे.
या शिवसेनेच्या शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्यावेळी शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार भावनाताई गवळी, शिवसेना प्रवक्ते संजय निरूपम, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठया संख्येने उपस्थित होते.