Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण मात्र पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. बंद दाराआड जागा वाटपावरून खलबत सुरू असल्याचे समजते.
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटातील घटक पक्षातील नेत्यांकडून आता आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अन विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत.
दरम्यान भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व देखील राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाल्याचे चित्र आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात दाखल होत आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा हे नुकतेच महाराष्ट्रात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शहा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची रणनीती देखील तयार केली आहे.
त्यांनी विधानसभेचा गड जिंकण्यासाठी एक नवीन योजना आखली आहे. त्यांनी काल, मंगळवारी (24 सप्टेंबर 2024) एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यामध्ये त्यांनी विदर्भासाठी 45 प्लसची घोषणा दिली आहे. विदर्भ विभागासाठी 45 प्लस ची योजना जाहीर करण्याबरोबरच शहा यांनी कालच्या या बैठकीत कार्यकर्त्यांच्या वेदना मला कळतात असे म्हटले आहे.
मात्र, भाजप निष्ठावंतांच्या डोक्यावर इतर पक्षांच्या नेत्यांना बसू देणार नाही, असेही अमित शहा म्हणाले आहेत. यामुळे शहा यांनी केलेले हे वक्तव्य महायुतीमधील इतर घटक पक्षातील नेत्यांना उद्देशूनच केले असल्याचे बोलले जात आहे.
अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार, “पक्ष निष्ठावंतांना फारसे काही देत नाही, तर बाहेरच्या लोकांना काय देणार ? अशा परिस्थितीत बूथवर पूर्ण ताकदीनिशी काम करा. सहकार क्षेत्रातील आणि आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांचा समावेश करा.”
शहा यांनी भाजपाने काँग्रेससह उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नष्ट करावी, असे म्हटले आहे. केंद्रीय मंत्र्याच्या म्हणण्यानुसार, “भाजपचे निष्ठावंत घरी बसणार नाहीत. आम्ही नकारात्मक मानसिकतेने पुढे जाणार नाही.” कालच्या भेटीदरम्यान अमित शहा यांनी त्यांना (भाजप) महाराष्ट्राची निवडणूक जिंकायची आहे असा निर्धार केला आहे.