Mahavikas Aaghadi : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेला वेध लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकांचे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. याची घोषणा लवकरच होणार आहे. या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार चर्चासत्र सुरू झाले आहे.
दोन्ही गटांमध्ये जागावाटपसंदर्भात जोरदार खलबद सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीच्या जागावाटपसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
शनिवारी काँग्रेस, शिवसेना (उद्धव) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा केला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 288 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव) समसमान जागा लढवतील, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 84 जागा दिल्या जाणार आहेत.
एवढेच नाही तर आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये सामील होणाऱ्या संभाव्य छोट्या पक्षांसाठी चार जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अजून महाविकास आघाडी कडून या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेले नाही मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये जागा वाटपाचा हा फॉर्म्युला फायनल झाला असल्याचा दावा केला जाऊ लागला आहे.
काही जागांची अदलाबदल होणार
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जागावाटपाबाबत नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जागांवर चर्चा झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत ज्या पक्षांनी विजय मिळवला आहे, त्यांना त्या जागा बिनशर्त दिल्या जातील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते.
महत्त्वाचे म्हणजे महायुतीमध्ये देखील सीटिंग गेटिंगचा हा फॉर्म्युला फायनल झाला आहे. अर्थातच विद्यमान आमदाराच्या पक्षांनाच ती जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर महाविकास आघाडीच्या या बैठकीत गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागाबाबत सुद्धा बोलणी पूर्ण झाली आहे. राज्यातील एकूण 245 जागा तीन पक्षांमध्ये विभागल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.
या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चांअंती काँग्रेस 100, शिवसेना (UBT)-100 आणि राष्ट्रवादी (शरद पवार) 84 जागांवर लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. एमव्हीएच्या पुढील बैठकीत जिंकलेल्या जागांवर फेरबदलाबाबत चर्चा होऊ शकते, मात्र एकूण जागांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. म्हणजेच या तिन्ही घटक पक्षांमध्ये जागा आदलाबदल होऊ शकतात परंतु जागांची संख्या तेवढीच कायम राहणार आहे.
या विभागातील 30 ते 35 जागांवर पेच कायम
महाविकास आघाडीमध्ये सध्या 30-35 जागांवर पेच कायम आहे. MVA च्या तीनही घटकांनी मराठवाडा, मुंबई आणि विदर्भातील 30-35 जागांवर दावा केला आहे. यामुळे जागा वाटप संदर्भात नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत या जागांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता या सर्वेक्षणात ज्याची ताकद जास्त दिसून येईल त्याला ती जागा मिळणार आहे. यामुळे आता या सर्वेक्षणाकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे. तसेच, त्याचा निर्णय हा दुसऱ्या टप्प्यातील बैठकीत होणार आहे. एवढेच नाही तर आगामी निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करताच लढवणार आहेत.
खरे तर उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीने जाहीर करावी असे आवाहन केले होते. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करताच निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर जागा वाटपा संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदा संदर्भात कोणताही पक्ष कुठलेच विधान करणार नाही असे ठरवण्यात आले आहे. जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हाच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार आहे.