शिर्डी मतदार संघातील वातावरण सध्या गरमागरम झाले आहे. तेथील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटासोबत भाजपसोबत सत्तेत गेले. त्यामुळे आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अनेकांनी लॉबिंग सुरु केले आहे. अनेक मातब्बर याठिकाणी आपली खासदाकीची इच्छा व्यक्त करत आहेत. परंतु आता ही निवडणूक तोंडावर आली असतानाच आता महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे.
नुकतेच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिडीं मतदारसंघात काँग्रेसचे काहीही अस्तित्व नसल्याचे म्हटले होते. आता याचा समाचार अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी घेतलाय. ते म्हणाले, वाकचौरे यांनी खासदार असताना कोणते विधायक काम केले, असा सवाल केला आहे.

तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असून लोकसभेला हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळेल, त्यामुळे कोणीही खासदारकीचे दिवास्वप्न पाहू नये असा टोला त्यांनी वाकचौरे यांना लगावला. तसेच आशा माणसांमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरू शकते असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता निवडणुकांआधीच शिर्डीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
वाद श्रेष्ठींपर्यंत जाणार
यावेळी वाघमारे यांनी मोठा घणाघात केला. ते म्हणाले, वाकचौरे यांनी त्यांच्या काळात सभामंडप सोडून एकही विधायक काम केले नाही. आजी-माजी खासदारांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल असे ते म्हणाले. शिवसेनेचे (ठाकरे गट ) मतदारसंघात अस्तित्व नाही.
बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी त्यांनी त्यांचे आत्मपरीक्षण करावे असे ते म्हणाले. तसेच वाकचौरे यांची विधिमंडळ नेते तक्रार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच त्यांच्याही पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता हा वाद श्रेष्ठींपर्यंत जाईल असे दिसत आहे.