मनोज जरांगे पाटील यांनी खरंच राहुरीतील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठींबा दिलाय का ? व्हायरल बातमीचे सत्य काय ?

Tejas B Shelar
Published:
Manoj Jarange Patil Fact Check News

Manoj Jarange Patil Fact Check News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत आमने-सामने आहेत.

महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भारतीय जनता पक्ष अन काँग्रेस असे सहा प्रमुख पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

यामुळे या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता देखील आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

या मतदारसंघात महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. दुसरीकडे महायुतीकडून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या दोन्ही उभय नेत्यांच्या माध्यमातून आता प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. मात्र गत काही दिवसांपासून मतदार संघात एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. व्हाट्सअप, इंस्टाग्राम तसेच youtube सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुरीचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत.

व्हाट्सअँपवर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे ज्या फोटोमध्ये शिवाजीराव कर्डिले यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे लिहिलेले आहे आणि खाली मनोज जरांगे पाटील यांचे नाव आहे.

यामुळे मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांनी खरंच शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा दिला आहे का? त्यांनी खरच मराठा समाजाला शिवाजीराव कर्डिले यांना विजयी करा असे आवाहन केले आहे का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, आज आपण याच पोस्टची फॅक्ट चेक करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियामध्ये जी पोस्ट व्हायरल होत आहे ती पोस्ट फेक असल्याचे आढळून आले आहे. मराठा आंदोलनाचे शिल्पकार मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून सध्या सोशल मीडियामध्ये जी पोस्ट व्हायरल होत आहे ती पोस्ट खोटी असल्याचे म्हटले गेले आहे. जरांगे पाटील यांनी सुद्धा हे साफ खोटे असल्याचे म्हटले आहे.

राहुरीचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या समर्थनार्थ कोणतेच वक्तव्य जरांगे यांनी केलेले नाही. त्यांनी मराठा समाजाला शिवाजीराव कर्डिले यांना विजयी करा असे आवाहन केलेले नाही. कर्डिले यांना मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलेला नाहीये, म्हणजे सध्या राहुरी मतदार संघात सोशल मीडियामध्ये जी पोस्ट व्हायरल होत आहे ती फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरंतर गेल्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील मराठा आंदोलनाचा मुद्दा गाजला होता.

लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका महायुतीला थोड्याफार प्रमाणात का होईना बसला होता, असे मत राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात आले होते.

यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थकांकडून मराठा आंदोलनाचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी तर ही पोस्ट व्हायरल केली जात नाही ना ? हा देखील प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होऊ लागला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे मंत्री होते. त्यावेळी त्यांनी मतदारसंघात अनेक लोकाभिमुख कामे केलीत. मंत्री पदावर असतांना त्यांनी मतदारसंघासाठी मोठा निधी आणला होता.

त्यांनी मतदारसंघात केलेल्या कामांची अनेकांना भुरळ पडली होती. यामुळे, या विधानसभा निवडणुकीत देखील तनपुरे यांच्या बाजूने जोरदार वातावरण निर्मिती पाहायला मिळत आहे. तनपुरे हे आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावरच सध्या मतदारांमध्ये जात आहेत.

मतदार संघात तनपुरे यांना मतदारांकडून जोरदार प्रतिसादही मिळतोय. तनपुरे यांनी प्रचारात सध्यातरी आघाडी घेतलेली आहे. यामुळे तर महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थकांकडून निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत नाही ना ? हा सुद्धा प्रश्न तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांसहित सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. तथापि ही पोस्ट नेमकी कोणी केलीय, ही पोस्ट कुठून व्हायरल झालीये याबाबत अजून ठोस माहिती हाती आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe