Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आता महायुती व महाविकास आघाडी मधील पक्षांची एकत्रित बांधणी करण्याची मोठी जबाबदारी वरिष्ठांवर असणार आहे.
त्या अनुशंघाने पहिले पाऊल अहमदनगर जिल्ह्यात टाकले गेले आहे. जिल्ह्यात १४ जानेवारीला नगर जिल्ह्यात महायुतीचा पहिला मेळावा होणार असून त्या अनुशंघाने पूर्वतयारीची आढावा बैठक नगरमध्ये पार पडली. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आरपीआय व घटक पक्ष या बैठकीत होते.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी सर्व घटकपक्ष एक कसे राहतील यावर भर दिल्याचे दिसते. परंतु बैठकीत ‘विसंवादाची’ ठिणगी पडल्याचे दिसते. दरम्यान हा सगळं विसंवाद दूर करण्याचे आश्वासन देत एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
महायुतीमधील विसंवाद दूर करण्याचे आवाहन
भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आरपीआय व घटक पक्ष अशी ही महायुती असून या सर्वांमधील विसंवाद दूर करण्याचे आवाहन आता असणार आहे. यावर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले, राज्य पातळीवर वरिष्ठ नेते एकत्र फिरताना दिसतात.
मात्र बऱ्याच प्रमाणात स्थानिक पातळीवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये विसंवाद आहे. घटक पक्षांचा हा विसंवाद दूर करण्यात येईल. महायुतीच्या या मेळाव्यातून राजकीय दिशा स्पष्ट होणार आहे. त्यासाठी तुम्ही नियोजन करा, प्रत्येक जिल्ह्यात ऐतिहासिक मेळावा झाला पाहिजे, असे विखे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचे माहिती पत्रके काढा, असा सल्ला देत त्यासाठी मी बजेट ठरवून देतो. महायुतीसाठी मी खर्च करेल, असे स्पष्ट केले.
मुंडे -गायकवाड यांच्यात ठिणगी ?
या बैठकीवेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड होते. परंतु त्यांत शाब्दिक ठिणगी पडल्याचे दिसते. मुंडे यांनी यावेळी भाजप व शिवसेनेची नैसर्गिक युती असल्याचा उल्लेख करून राष्ट्रवादी प्रथमच व्यासपीठावर आली आहे. आगामी काळात शरद पवार व अजित पवार या गटाचे कार्यकर्ते कोण आहेत. यावरही विचार केला जावा, असे सांगितले. त्यांनी असे म्हणताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी त्यांच्याकडे पाहत आम्हीही पहिल्यांदाच आलो आहोत, असा टोला लगावला, त्यावरून दोघांमध्ये ठिणगी पडल्याचे चित्र दिसून आले.
विखे यांची अयोध्येला जाण्यासाठी विशेष तयारी ?
या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी अयोध्येच्या श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २१ ते २६ जानेवारी यादरम्यान राज्यभर उत्सव केला जाणार असून २२ जानेवारीला अयोध्येला सर्वांना जाणे शक्य नसले तरी विशेष रेल्वे घेऊन आपण सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन जाऊ असे सांगितले आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमावर विखे यांनीही विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.