आमदारांचं असतंय परफेक्ट नियोजन, दिवसाला ५० कार्यक्रमांना अशाप्रकारे लावतात हजेरी!

Published on -

अहिल्यानगर – ग्रामीण भाग असो की शहर, लग्न, वाढदिवस, साखरपुडा, बारसे, दुकान उद्घाटन असे विविध कार्यक्रम रोज ठरलेले असतात. या प्रत्येक कार्यक्रमाला आमदार आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं, अशी जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे दिवसभर धावपळ करत वेळेवर हजेरी लावण्याचं गणित आमदारांनी परफेक्ट जुळवलेलं असतं. यामुळेच त्यांची जनतेतली लोकप्रियता कायम राहते.

आमदारांच्या स्वीय सहायकांशी संवाद साधला असता, हे संपूर्ण नियोजन सांभाळताना त्यांच्या पळापळीचा अंदाज आला. संग्राम जगताप, हे आपल्या जनसंपर्कासाठी प्रसिद्ध आहेत. लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कुटुंबातीलही राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्यांना जिल्हाभरातून निमंत्रण मिळतं.

जनतेला आपला आमदार वैयक्तिक कार्यक्रमाला यावा, हाच आग्रह असतो. लग्नपत्रिका, उद्घाटन सोहळ्यांची आमंत्रणं थेट कार्यालयात आणली जातात. ‘साहेब आलेच पाहिजेत!’ हा आग्रह धरला जातो. काही जण प्रत्यक्ष आमदारांना घेऊन जाण्यासाठीच कार्यालयात बसून राहतात!

अनेकदा कार्यक्रम आखणी नसतानाही अचानक हजेरी लावावी लागते. त्यामुळे कितीही नियोजन केलं तरी शेवटी धावपळ होतेच. संग्राम जगताप तिसऱ्यांदा आमदार झाल्याने त्यांचा मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क आहे. नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या कार्यालयात तब्बल ५७ कार्यक्रम पत्रिका आल्या होत्या! तोंडी निमंत्रण वेगळं! काहींनी तर थेट आमदारांना कार्यक्रमाला नेलंच.

शहरात आणि ग्रामीण भागात रस्त्यांची कामं सुरू असल्याने वाहतुकीची मोठी समस्या आहे. परिणामी, वेळेत पोहोचणं कठीण जातं. त्यामुळे काही वेळा आमदार दुचाकीवरून कार्यक्रमस्थळी पोहोचतात.

आमदार शिवाजीराव कर्डिले दिवसभर ३५ ते ४० कार्यक्रमांना हजेरी लावतात. सकाळी घर सोडले की रात्र झाल्याशिवाय परत नाही. जेवणाचा डबा सोबत असतो, आणि ते गाडीतच जेवण उरकतात. नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांचा दिनक्रमही असाच आहे.

दिवसभर कार्यक्रम, सभा, उद्घाटनं, राजकीय बैठका असल्या तरी लोकांसोबत थेट संपर्क राहावा म्हणून आमदारांकडून हे नियोजन केलं जातं. अगदी कुटुंबातील सदस्यांचीही मदत घेतली जाते. त्यामुळे कार्यक्रम आणि जनसंपर्क यांचं गणित बेमालूम जुळवण्याचं कसब आमदारांकडे असतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe