महापालिकेतील बेफिकीरीकडे खा. लंके यांनी वेधले लक्ष, आयुक्तांशी पत्रव्यवहार जन्म, मृत्यू प्रमाणपत्र विभागातील कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा

Published on -

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र कर्यालयातील नागरिकांना होणारा प्रचंड त्रास हा अत्यंत गंभीर आणि असहाय्य झाला असून या कार्यालयातील दिरंगाई, बेफिकीरपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उध्दट वर्तनात त्वरीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशा मागणीचे पत्र खा नीलेश लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे.

या पत्रामध्ये खा. लंके यांनी नमुद केले आहे की, नगर शहरात मोठया प्रमाणावर जन्म, मृत्यूची नोंद होत असल्याने शहरासोबतच ग्रामीण भाग आणि इतर तालुक्यांतूनही हजारो नागरीक प्रमाणपत्रासाठी या कार्यालयात येत असतात. मात्र त्यांना वेळेवर सेवा मिळत नाही. कर्मचाऱ्यांकडून उध्दट वर्तन केले जाते. नागरिकांना अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. या कार्यालयातील ही परिस्थिती अतिशय गंभीर असून प्रशासनाने तातडीने सुधारणा करणे आवष्यक असल्याचे खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे.

प्रमाणपत्र तातडीने द्यावे

जन्म व मृत्यू प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे. अर्जदारांना ठरावीक कालमर्यादेत प्रमाणपत्र मिळेल याची हमी घेण्यात यावी. अनावष्यक दिरंगाई केल्यास सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कर्मचाऱ्यांचे वर्तन सुधारावे. कर्मचारी जनतेशी नम्रपणे आणि सहानुभूतीने वागतील याची जबाबदारी आयुक्तांची आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने उध्दट वर्तन केल्यास त्याच्यावर निलंबासह कठोर कारवाई करण्यात यावी असे खा. लंके यांनी या पत्रात म्हटले आहे.

कार्यप्रणाली सुधारा

कार्यालयात होणारी गर्दी आणि नागरिकांचा वेळ वाया जाणे हे टाळण्यासाठी अतिरिक्त खिडक्या सुरू करा, कर्मचारी संख्या वाढवा.नागरिकांना सतत महापालिकेत चकरा मारू लागू नयेत यासाठी ऑनलाईन अर्ज व प्रमाणपत्र वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करा. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तक्रार कक्ष सुरू करून ठरावीक कालावधीत तक्रारींची जबाबदारी निश्चित करा अशी सुचना खा. लंके यांनी केली आहे.

आरोग्य अधिकारी जबाबदारी टाळतात

आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला असता ते जबाबदारी घेण्याऐवजी टाळतांना दिसून येतात. माहीती सुविधा केंद्र दुपारी चार वाजता बंद करतात. त्याची वेळ चार ऐवजी सायंकाळी पाच अशी करण्यात यावी. जेणेकरून नागरीकांना मागे जावे लागणार नाही अशी सुचनाही खा. लंके यांनी केली आहे.

तर कारवाई करण्याची शिफारस

महापालिकेच्या कार्यशैलीत तात्काळ सुधारणा न झाल्यास अधिकाऱ्यांवर प्रशासकीय पातवळीवर कारवाई करण्याची शिफारस करण्यास मला भाग पाडले जाईल. नागरिकांची सेवा तुमची जबाबदारी आहे आणि ती वेळेवर व तत्परतेने पार पाडली गेली पाहिजे.- खासदार नीलेश लंके, लोकसभा सदस्य

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News