सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असून, सर्वच ठिकाणच्या पाण्याचे उगम आटून गेले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदे, कर्जत तालुक्यांतील शेती पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पावर अवलंबून आहे. कुकडी प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

या तिन्ही तालुक्यांत माणसांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. माणसांच्या पिण्याच्या पाण्यासह फळबागांना पाणी, जनावरांच्या पिण्यासाठी पाणी व चाऱ्यासाठी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे.
पिंपळगाव जोगा धरणामध्ये उपलब्ध असलेल्या मृत साठ्यातून साडेतीन टीएमसी पाणी कुकडी डाव्या कालव्यात सोडण्याबाबत शासनस्तरावर परवानगीसह आदेश संबंधितांना देण्यात यावेत, अशी विनंती खासदार लंके यांनी या निवेदनात केली आहे.