जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करा खासदार नीलेश लंके यांची संसदेत ठाम मागणी

Published on -

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण आणि दुरदर्शी मागणी खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी संसदेमध्ये केली. त्यांनी जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यापीठ स्थापन करण्याची आवष्यकता असल्याचे ठामपणे अधोरेखित केले.

खासदार लंके यांनी आपल्या मागणीत स्पष्ट केले की, अहिल्यानगर हा जिल्हा मध्यवर्ती असून येथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू केल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची उत्तम संधी मिळेल. त्यांनी भर दिला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये स्थलांतर करावे लागते. त्यामुळे आर्थिक भार वाढतो आणि अनेकदा शिक्षण अर्धवट राहते.

खा. लंके यांनी अहिल्यानगरच्या ऐतिहासिक महत्वालाही अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, अहिल्यानगर जिल्ह्याला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्याचा भौगोलिक मध्यवर्तीपणाही शिक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो. त्यामुळे येथील विद्यापीठ केवळ जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी शिक्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.

बहुविध अभ्यासक्रमांसाठी केंद्र बनण्याची क्षमता

आपल्या मागणीच्या मांडणीदरम्यान खा. लंके यांनी असेही नमुद केले आहे की, प्रस्तावित विश्वविद्यालय कृषी,अभियांत्रिकी,आरोग्य, सामाजिक विज्ञान आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये अभ्यासक्रम आणि संशोधन केंद्र म्हणून कार्य करू शकेल. हे विश्वविद्यालय केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता नवीन ज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाला चालना देणारे केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रोजगारनिर्मिती, सामाजिक विकास

या विश्वविद्यालयामुळे स्थानिक तरूणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शिक्षक, संशोधक, प्रशासकीय कर्मचारी यांच्यासह अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध होणार असल्याचे लंके यांनी अधोरेखित केले. या विश्वविद्यालयामुळे संपूर्ण जिल्ह्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!