नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून ही सेवा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था,आरोग्य सेवा तसेच धार्मिक पर्यटनास चालना मिळेल. नगर-मुंबई हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून जिल्हयासाठी विमानतळाची गरज असल्याने जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी महत्वपुर्ण असल्याने त्यासाठी लढा दिला जाईल असा निर्धार खासदार नीलेश लंके यांनी केला.
नगर शहर व जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आर्किटेक्टस, इंजिनिअर्स ॲण्ड सर्वेअर्स असोसिएशन, द इंस्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स आणि बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत खा. नीलेश लंके यांची नगर शहरात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खा.लंके यांनी शहर तसेच जिल्ह्याच्या विकासातील अडचणी जाणून घेतल्या व उपाययोजना कशा करता येईल यासंदर्भात या चर्चा करण्यात आली.

या बैठकीत विविध संस्थांनी शहराच्या विकासासमोरील अडथळयांबाबत माहिती दिली. रक्षा मंत्रालयाच्या अटी, पुरातत्व विभागाचे निर्बंध, टाऊन प्लॅनिंगमधील भ्रष्टाचार तसेच रेड आणि ब्लू लाईनसंबंधीच्या नियमांमुळे शहराचा विकास ठप्प होत असल्याचे मुद्दे यावेळी मांडण्यात आले.
क्रेडाईच्या प्रतिनिधींनी सिना नदीच्या रेड आणि ब्लू लाईनच्या अटींमुळे बांधकाम आणि शहराचा विस्तार अडखळल्याची तक्रार केली. नगर शहरास पुराचा फारसा धोका नसतानाही हे नियम लागू केल्याने विकास प्रक्रियेत अडथळे येत आहेत. जलसंपदा विभागाकडे हा विषय उपस्थित करून आवष्यक त्या सुधारणा करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.
एईएसए संस्थेने संरक्षण मंत्रालयाशी संबंधित समस्या मांडल्या. नगर शहर कोणत्याही कन्स्ट्रक्शन झोनच्या यादीत नसतानाही बांधकाम परवानग्या देताना अडचणी येत आहेत. तसेच पुरातत्व विभागाने काही स्मारकांना संरक्षित स्थळांचा दर्जा दिल्यामुळे त्या ठिकाणी विकास कामांवर निर्बंध आल्याकडे यावेळी खा. लंके यांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी करण्यात आलेल्या विविध मागण्यांची दखल घेत पुढील उपाययोजना करण्याची ग्वाही खा. लंके यांनी यावेळी दिली. या बैठकीत उपस्थित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी खा. नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणूकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या बैठकीस या संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये अतुल आत्रे, रामनाथ वैराहर, हरीश इंगळे, अमित मुथा, विनोद काकडे, गिरीश अग्रवाल, आदिनाथ दहीफळे, संजय गुंदेचा, यश शाह, विजयकुमार पाडीर, दीपक दारे, अभय राजे, बबन खैरे, दीपक विधाते, प्रकाश गांधी, दादासाहेब करंजुले, राहुल शिंदे, भारत गोडसे, प्रीतम भंडारी, गिरीष जाधव, विक्रम राठोड, नगरसेवक योगिराज गाडे यांचा समावेश होता.
ठेकेदारांच्या प्रलंबित बिलांसाठी पाठपुरावा करा
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनी गव्हर्नमेंट कॉन्ट्रक्टरर्सच्या प्रलंबित बिलांसदर्भात प्रश्न उपस्थित केला. सहकारी विभागाकडून होणा-या विलंबामुळे अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून काहींवर आत्महत्या करण्याची वेळही आली आहे. या समस्येवर त्वरीत तोउगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
औद्योगिक वापराच्या वीजेचे दर कमी हवेत
इंजिनिअर संघटनांच्या वतीने औद्योगिक क्षेत्रातील वीज दर कमी करण्याची मागणी केली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील व्यवसायिक आणि औद्योगिक वीज वापराचे दर अधिक असल्याने उद्योगधंद्यांना फटका बसत आहे. संपूर्ण देशभर एकसमान वीज दर लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे यावेळी खा. लंके यांना यावेळी घालण्यात आले.
नगर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खा. नीलेश लंके यांची विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली.