१७ फेब्रुवारी २०२५ नारायणगाव : जुन्नर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाजार समितीच्या एका बंद रूममध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाल्याने ही भेट नक्की कोणत्या कारणाने झाली, यावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी रविवारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सकाळी ११.३० च्या सुमारास अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

या भेटीत बाजार समितीच्या एका बंद रूममध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा सुरू होती.यावेळी अजित पवार व संदीप क्षीरसागर हे दोघेच होते. त्यामुळे ही भेट कोणत्या कारणाने झाली व आतमध्ये काय चर्चा झाली, यावर विविध तर्क-वितर्क सुरू झाले.अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून अप्रत्यक्षरीत्या टार्गेट करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी नुकतीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
त्यानंतर रविवारी अचानक आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडवरून थेट जुन्नर गाठून अजित पवार यांची भेट घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही भेट जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी घडवून आणल्याचे समजते.जुन्नरच्या या भेटीत आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे बीड शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात भेटून चर्चा केली. मात्र, राजकीय वर्तुळात क्षीरसागर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याची चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांनी पत्रकारांना सुनावले ?
अजित पवार यांना पत्रकारांनी भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, तुम्ही इतके वेडे आहात का ? मी राज्याचा उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे.बीडला गेल्या २१ दिवसांपासून प्यायला पाणी नाही. संदीप क्षीरसागर हे विरोधी पक्षाचे आमदार असले तरी ते माझ्या भेटीसाठी आले होते. तुम्ही काही तरी ब्रेकिंग न्यूज करता, असे उत्तर पवार यांनी दिले.
माझ्या कामाला यश मिळेल
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासन पातळीवर मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची जुन्नर येथे भेट घेतली. पालकमंत्री पवार यांनी याविषयी विद्युत विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांना तातडीने फोन करून यावर तत्काळ मार्ग काढावा, असे आदेश दिले आहेत.