मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार, एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महाविकास आघाडीच्या निर्णयांमध्ये शिंदे सरकार बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या विषयावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला थेट आव्हान दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनापासून पुन्हा चर्चेत आलेल्या वसंत मोरेंनी ट्विटरवरुन थेट शिंदे सरकारला आव्हान दिले आहे. “सरकार बदलले, असं ऐकतोय. प्रभाग रचनाही बदलणार आहात म्हणे. सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार,” असे ट्विट वसंत मोरे यांनी केले आहे.
“माझे सरकारला एक आव्हान आहे. हिंमत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच असेल, असे म्हणत मोरेंनी मनसेचाच महापौर होण्यावर विश्वास व्यक्त केला आहे.