Nagaland Election Result : काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात नागालँडमध्ये महाराष्ट्राच्या दोन पक्षांचा डंका वाजला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तिथं 7 तर केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपाइंने 2 जागा जिंकल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद देखील मिळू शकते. दरम्यान, नागालँडच्या 60 पैकी 40 जागा मिळवत भाजप आणि मित्रपक्षानं सत्ता राखलीय. काँग्रेसला गेल्यावेळे प्रमाणे यावेळीही नागालँडमध्ये एकही आमदार जिंकवून आणता आलेला नाही.

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार हा निकाल आहे. या आकडेवारीनुसार नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या सहा जागा पक्क्या झाल्या आहेत. तर आणखी एका जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे, यामुळे हा आकडा वाढू शकतो.
नागालँडच्या 2018च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सहा जागांवर उभे होते. पण त्यावेळी एकाही उमेदवाराला यश मिळाले नव्हते. सर्व जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची डिपॉजिट जप्त झाली होती. आता मात्र मोठे यश मिळाले आहे.
असे असताना नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी अर्थात एनडीपीपी पक्ष आणि भाजप यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रियो हे आता पाचव्यांचा नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.