Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघात आज मतदान झाले. नाशिक शिक्षक मतदारसंघात एकुण २१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी महायुतीचे उमेदवार किशोर दराडे, महाविकास आघाडीकडून ॲड. संदीप गुळवे तर अपक्ष विवेक कोल्हे असा तिरंगी सामना होईल अशी शक्यता आहे.
दरम्यान आज एकूण ९० मतदान केंद्रावर मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ८४.८६ टक्के मतदान झाल्याची माहिती हाती आली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाला. नाशिकमधील बीडी भालेकर शाळेच्या मतदान केंद्राबाहेर हा गोंधळ पाहायला मिळाला. मतदान केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती पैसे वाटप करत असल्याच्या कारणावरून गोंधळ उडाला.
पैसे वाटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या व्यक्तीला भद्रकाली पोलीस ठाण्यात नेले आहे. या प्रकारामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षक मतदारसंघात मतदान झाले यात जामखेड तालुक्यात ९५.८२ टक्के मतदान झाले मतदान केंद्र जामखेड तहसील कार्यालयात होते.
नाशिक शिक्षक मतदारसंघात नगर जिल्ह्यात एकूण १७ हजार ३९२ मतदार आहेत. त्यांची जिल्ह्यातील २० मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. नगर, संगमनेर येथे प्रत्येकी ३, राहता व कोपरगाव येथे प्रत्येकी २ तर इतर सर्व तालुक्यातून प्रत्येकी १ मतदान केंद्र होते.
नाशिक विभागात एकूण ९० मतदान केंद्र होते. प्रत्येक मतदान केंद्रावरून ‘वेब कास्टिंग’ची व्यवस्था करण्यात आली होती. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर ५ याप्रमाणे नगर जिल्ह्यात १०० वर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मतदान वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी होती. दरम्यान सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळात नंदुरबार जिल्ह्यात ९०.२५ टक्के , धुळे ८६.५९ टक्के, जळगाव ८३.६१ टक्के , नाशिक ८५.३५ टक्के, अहमदनगर ८२.६२ टक्के असे एकूण ८४.८६ टक्के मतदान झाले.
मतदान संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व मतपेट्या राहाता येथे संकलित करून त्यानंतर मतमोजणीसाठी नाशिकला रवाना केल्या जाणार आहेत. मतमोजणी १ जुलैला अंबड (नाशिक) येथील एमआयडीसीच्या गोदामात होणार आहे.