Maharashtra News : महाराष्ट्रात राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अनेक प्रस्थापित मंत्री, आमदार अजित दादांसोबत गेले. मोजकेच लोक शरद पवारांसोबत राहिले. आता स्वतः शरद पवार पक्ष संघटन, लोकसभा आदींसाठी रणांगणात उतरले आहेत.
बंडानंतर शरद पवार गटाचे पहिले मंथन शिबिर नवीन वर्षात ३ व ४ जानेवारीला शिर्डीमध्ये होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही दिवस या शिबिरात मार्गदर्शन करणार असून
सर्व पदाधिकारी, आजी माजी आमदार खासदार, देशभरातील मान्यवर असणार आहेत.
मोठ्या पवार साहेबांचा करिष्मा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर आहे. कार्यकत्यांमध्ये उत्साहाची ज्योत स्वतः शरद पवार पेटवणार आहेत. निवडणुकांशिवाय पक्षाची ध्येयधोरणे, देशातील विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.
पक्षसंघटनेचे सक्षमीकरण, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी करावे लागणारे नियोजन आदींसह इतर गोष्टींवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन यावेळी करतील. प्रमुख वक्त्यांना या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
निष्ठा, लोकशाही शब्दांवर भर
या शिबिराचे “ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची” असे नाव आहे. या शिबिरात सध्याची राजकीय परिस्थिती कशी बदलली, शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, उद्योजकांचे हाल,
सरकारला विसर पडलेली लोकशाही मूल्य, संविधानाचे होत असलेले अवमूल्यन, निष्ठा, लोकशाही आदींबाबत मंथन होणार आहे.
शिबिरात कोण कोण येणार ?
मागील वर्षी शिर्डीतच राष्ट्रवादीचे शिबिर झाले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्व पदाधिका-यांसाठी हे मंथन शिबिर आयोजित केले असल्याची
माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीये. पक्षाचे सर्व विद्यमान-माजी खासदार, आमदार, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरलेले उमेदवार, सर्व आघाडयांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष या शिबिराला येणार आहेत.