एमआयडीसी व पाणीप्रश्नावरून सभापती राम शिंदे यांना राष्ट्रवादीचा घरचा आहेर

Published on -

अहिल्यानगर : तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा व बेरोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी आदी प्रश्न सभापती प्रा.राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनी सोडवावा, अन्यथा जामखेडच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला.त्यामुळे हा इशारा म्हणजे सभापती राम शिंदे यांना घरचा आहेर समजला जात आहे.

जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना अशोक सावंत म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सभासद नोंदणी करत आहोत. राज्याच्या तिजोरीची चावी माझ्या नेत्यांकडे आहे त्यामुळे यापुढे जामखेडकरांवर अन्याय होणार नाही.राजकारणातील खरा पांडुरंग अजित पवार आहेत.

जामखेड या दुष्काळी तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरावयाचा आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी तसेच बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे, प्रश्न सुटला नाही तर महेश निमोणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे केले जाणार आहे.यावेळी महेश निमोणकर म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन गायवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मी २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करत आहे.

नामदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून जामखेड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आला असून ते कामे मोठ्य़ा प्रमाणात कामे झाली आहेत.रोहित पवार हे केवळ आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच आमदार झालेले आहेत. या तालुक्यात पंचवीस ते तीस वर्षे कुकडीच्या पाण्यावर राजकारण झाले तरीही प्रश्न सुटलेला नाही.

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आपण कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार आहोत. जामखेड तालुक्यात सर्वात जास्त सभासद नोंदणी करणार असल्याचे निमोणकर यांनी सांगितले. उपाध्यक्ष बापुराव शिंदे म्हणाले की, जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून अभियान यशस्वी करू.महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर म्हणाल्या की, अजित पवार हे कामाचे आहेत, अहोरात्र काम करतात, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या त्या सोडवा, आपला पक्ष म्हणजे दादाच आहे.

युवती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे म्हणाल्या की, जामखेड परिसरात अजित पवार यांना मानणारा गट मोठा आहे. याचा फायदा घेऊन संघटना मजबूत करू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या पक्षाला झुकते माप मिळाले पाहिजे कारण आतापर्यंत दादाच्या निधीचा इतरांनी फायदा घेतला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोहळकर यांनी तर आभार सुरज रसाळ यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News