विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची खेळी ! अजित पवारांचा अहिल्यानगरमधून उमेदवार ?

Published on -

Maharashtra Politics : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपद वाटपावरून अनेक असंतोष उफाळले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हे चित्र पाहायला मिळाले. काही नेत्यांना मंत्रीपद मिळाले नाही, तर काहींना मिळालेले खाते समाधानकारक नव्हते. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीनाट्य सुरूच होते. आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हीच डोकेदुखी पुन्हा समोर येण्याची शक्यता होती.

अजित पवारांची रणनीती

या डोकेदुखीवर तोडगा म्हणून अजित पवार सेफ खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. कोणत्याही वादाला तोंड फुटू नये आणि संघटनेत जुनी निष्ठा दाखवलेल्या नेत्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी पक्ष संघटनेत कार्यरत असलेल्या आणि कोणत्याही गटाचा विरोध होणार नाही अशा नेत्यांना संधी देण्याचा विचार केला आहे.

संग्राम कोते पाटील आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेतील एकच जागा येत असल्याने इच्छुकांची मोठी संख्या असून, स्पर्धाही तगडी आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या आणि पराभूत झालेल्या, दोन्ही गटातील नेते इच्छुक असल्याने पक्षासाठी निर्णय कठीण ठरतोय. मात्र, पक्षाच्या संघटनेत पूर्वीपासून सक्रीय असलेले शिर्डीचे संग्राम कोते पाटील हे या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

नाव जवळपास निश्चित?

संभाव्य उमेदवार म्हणून झिशान झिद्दीकी, आनंद परांजपे आणि संग्राम कोते पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र, कोते पाटील यांच्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना त्यांनी विद्यार्थी संघटनेपासून पक्षात काम केले आहे. पक्ष फूटल्यानंतरही त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि पक्षासाठी सक्रिय राहिले. त्यामुळे अजित पवारांचे विश्वासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

निवडणूक बिनविरोध ?

पक्षीय संख्याबळ पाहता राष्ट्रवादीची ही जागा बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीत मतदान महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या आमदारांचे होणार आहे.

संघर्ष टाळण्याची खेळी

अजित पवार कोणत्याही वादात अडकू इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांचा झुकाव संघटनेत निष्ठेने काम केलेल्या आणि कुणाच्याही विरोधात जाऊ न शकणाऱ्या उमेदवारांकडे आहे. संग्राम कोते पाटील यांनी अलीकडेच शिर्डीतील पक्ष अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आणखी वाढली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला एकच जागा येत असली तरी इच्छुकांची संख्या अधिक आहे. जर एका गटातील नेत्याला संधी दिली तर दुसरा गट नाराज होईल. हा वाद टाळण्यासाठी अजित पवारांनी संघटनेत निष्ठावान आणि कुठलाही वाद न होणारा नेता निवडण्याची रणनीती आखली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe