नेवासा मतदारसंघात भाजपाला दे धक्का, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे भाजपा सोडणार ; विद्यमान आ. शंकरराव गडाख यांचा विजयाचा मार्ग सोपा ?

Nevasa News : नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मोठे घमासान सुरू आहे. खरे तर विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी सार्वजनिक केली आहे.

या पहिल्या यादीत भारतीय जनता पक्षाने तब्बल 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. कर्जत जामखेड, शिर्डी, शेवगाव, राहुरी आणि श्रीगोंदा या जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उतरवले जाणार आहेत.

शेवगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे, शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंदा मधून श्रीमती प्रतिभा पाचपुते यांना तिकीट देण्यात आले आहे.

दरम्यान, नेवासा विधानसभा मतदारसंघाची जागा ही महायुती मधून शिंदे गटाला सुटणार आहे. त्यामुळे मात्र भाजपामधील इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. नेवासा विधानसभा मतदार संघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार उभा राहणार असून शिंदे गटाकडून यावेळी एका उद्योगपतीला तिकीट दिले जाईल असे म्हटले जात आहे.

त्यामुळे भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नाराज झाले असून त्यांनी भाजप सोडण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्यानंतरही ही जागा शिंदे गटाला सुटल्यानंतर माजी आमदार मुरकुटे यांनी आता आपला मोर्चा अजित पवार गटाकडे वळवलाय.

यामुळे सध्या महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी माजी आमदार मुरकुटे यांनी अजित पवार यांची भेट घेतलीये. यावेळी त्यांनी ही जागा राष्ट्रवादीने घेतली तर आपण भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू असा प्रस्ताव अजित दादांसमोर ठेवला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

नेवासा तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या समवेत असल्याचा दावा देखील माजी आमदारांनी केला. दरम्यान शनिवारी अजितदादांची एकट्याने भेट घेतल्यानंतर आज रविवारी माजी आमदार मुरकुटे हे विठ्ठलराव लंघे यांच्या समवेत एक शिष्टमंडळ अजित पवार यांच्या भेटीला घेऊन गेलेत.

यावेळी विठ्ठलराव लंघे आणि माजी आमदार मुरकुटे यांनी शिंदे गटाने जाहीर केलेला उमेदवार हा नवखा आहे, त्यांना तालुक्यातील गावे सुद्धा माहीत नाही, कार्यकर्ते माहीत नाही, ते कधीही लोकांच्या सुख दुःखात नसतात, तालुक्यातील जनता त्यांना ओळखत नाही, असे म्हणत शिंदे गटाच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली.

तसेच, माजी आमदार मुरकुटे यांनी मला राष्ट्रवादी कडून उमेदवारी द्या अशी मागणीही केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांनी यासंदर्भात आपण सकारात्मक विचार करू अशी ग्वाही देखील दिली आहे. यामुळे महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार आणि येथून नेमकं कोण उभे राहणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

पण महायुतीमध्ये सुरू असणाऱ्या या गदारोळाचा फायदा विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना होईल असे म्हटले जात आहे. महाविकास आघाडी कडून नेवासा विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाकडे येईल आणि येथून विद्यमान आमदार शंकराव गडाख यांना ठाकरे गट उमेदवारी देईल असे जवळपास फिक्स झालेले आहे.