निलेश लंके यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार ? अमोल कोल्हे यांच्या ‘त्या’ विधानाने भुवया उंचावल्या

Tejas B Shelar
Published:
Nilesh Lanke

Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण अधिक ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा अशा या दोन जागा. या दोन्ही जागांपैकी नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे.

सध्या नगर दक्षिणचे भाजपाचे डॉक्टर सुजय विखे पाटील हे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. विशेष म्हणजे यावेळी देखील त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा सुरू आहेत. सुजय विखे यांना भाजपाकडे विकल्प नसल्याचे बोलले जात आहे. ते सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. मध्यंतरी त्यांनी मतदारसंघात चणाडाळ आणि साखर वाटपाच्या माध्यमातून मत पेरणी देखील सुरू केली होती.

दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील आमदार राम शिंदे हे देखील या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी आपली इच्छा अनेकदा ओठांवर आणली आहे. विशेष म्हणजे या जागेवर महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी सातत्याने असे संकेतही दिले आहेत.

मात्र ही जागा महायुतीमधून भाजपाच्या वाट्याला येते. त्यामुळे महायुती मधून त्यांना तिकीट मिळणे हे जवळपास अशक्य असे भासत आहे.त्यामुळे निलेश लंके हे आगामी लोकसभेसाठी अजितदादा यांच्या गटातून पलटी मारतील आणि पुन्हा एकदा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात समाविष्ट होतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

तसेच जर निलेश लंके हे शरदचंद्र पवार यांच्या गटात समाविष्ट झाले तर त्यांना दक्षिणा म्हणून नगर दक्षिणची उमेदवारी मिळू शकते, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला आल्या आहेत. विशेष म्हणजे या चर्चा आता खऱ्या ठरणार की काय असे चित्र निर्माण झाले आहे. कारण की शरद पवार यांच्या गटातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.

जस की आपणास ठाऊकच आहे की, नगर शहरात निलेश लंके प्रतिष्ठानने स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य आयोजित केले होते. या महानाट्याचा चौथ्या दिवशी समारोप देखील झाला आहे. विशेष म्हणजे आयोजकांनी या महानाट्याला लाखोंच्या संख्येने गर्दी झाली असल्याचा दावा केला आहे.

महानाट्य शरदचंद्र पवार यांच्या गटातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने सजलेले होते. या महानाट्याला महायुतीच्या काही मोजक्या आणि महाविकास आघाडीच्या अनेकांनी हजेरी लावली होती. भाजपामधील आमदार राम शिंदे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी या महानाट्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी निलेश लंके यांचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे.

या महानाट्याला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकचा समावेश पाहायला मिळाला. त्यामुळे, हे महानाट्य निलेश लंके यांना लोकसभेचे कवाड खोलून देणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. विशेष म्हणजे या चर्चांना बळ देण्याचे काम शरद पवार यांच्या गटातील डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले आहे.

यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी, “शरदचंद्र पवार साहेबांकडे संपूर्ण महाराष्ट्र हा संघर्षयोद्धा म्हणून बघतोय. महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी आम्ही मावळे लढतोय. लोकनेत्यांच्या वाढदिवसासाठी गिफ्ट द्यायचे असते. मी मागतोय. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा, असा जर नेता आमच्या खांद्याला खांदा लावून मिळाला तर…, जबाबदारी तुमची आणि लोकनेत्यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी.” दरम्यान, कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निलेश लंके लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हातात तुतारी घेणार का ? शरद चंद्र पवार यांच्या गटात समाविष्ट होऊन निलेश लंके नगर दक्षिणेत विखे यांच्या विरोधात उभे राहणार का ? अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. यामुळे आता नगर दक्षिणेतून महाविकास आघाडी कडून कोण उभे राहते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe