२० मार्च २०२५, मुंबई : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर सभागृहाचे कामकाज पक्षपाताने आणि एकतर्फीपणे चालवल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी लावला आहे. सभागृहाचे कामकाज नियमांनुसार होत नसून, विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे हक्क डावलले जात असल्याने सभापतींनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, असा दावा करत त्यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे.
महाविकास आघाडीने यापूर्वी ५ मार्च रोजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध नियमाप्रमाणे प्रस्ताव सादर केला होता. परंतु, सभापती शिंदे यांनी मंगळवारी तो फेटाळून लावला. त्यानंतर बुधवारी, सभागृहाच्या ठरलेल्या कार्यक्रमात नसतानाही भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींसाठी विश्वास ठराव मांडला. यावेळी विरोधी पक्षनेत्याला आपली बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. या घटनांमुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला आणि कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

सभागृहात तीव्र घोषणाबाजी
विरोधकांनी सभागृहात सरकार आणि सभापतींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. “सभापतींचा धिक्कार असो”, “नाही चलेगी तानाशाही”, “लोकशाहीचा खून करणाऱ्या सभापतींचा निषेध असो”, “प्रवीण दरेकरांचा धिक्कार असो”, “न्याय द्या, लोकशाहीला न्याय द्या”, “लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी सभागृह तब्बल एक तास दणाणले.
काळ्या फिती लावून निषेध
या गोंधळादरम्यान महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी ते काळ्या फिती लावून सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. तसेच, उपसभापती नीलम गोऱ्हे डायसवर बसल्यास कामकाजात भाग न घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना पाशवी बहुमताचा माज चढला आहे. विरोधकांना बोलण्याची संधी न देता त्यांनी प्रस्ताव रेटून नेला, याचा आम्ही तीव्र विरोध केला