मुंबई : शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडल्याने अवघ्या महाराष्ट्रात या विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर गटाने मुंबईत पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बोलताना एक खंत बोलून दाखवली आहे.
‘कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती. त्यांनी साथ सोडली का? शेवटपर्यंत शरद पवार साहेब त्यांना राजीनामा देऊ नका असे सांगत होते. त्यामुळे उद्धव यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवे. शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झाले आहेत. आम्ही मात्र, त्यांना दूरचे झालो आहोत, असे म्हणत दीपक केसरकरांनी ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नाही. आमच्या मित्रपक्षाने एकनाथ शिंदे आणि आमच्या इतर नेत्यांवर भाष्य करू नये असेही केसरकर यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणारा मनाचा मोठेपणा उद्धव यांच्याकडेदेखील आहे. आता, उद्धव यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा करतो. या संघर्षाचा शेवट गोड होणार आहे, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.