Maharashtra News : महाराष्ट्रातील वातावरण आरक्षणाच्या मागणीने चांगलेच ढवळून निघाले आहे. परंतु आता राजकीय वातावरण देखील आता चांगलेच ढवळून निघेल असे चित्र आहे. एकीकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
तर आरक्षणास विरोध करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ सभा घेत आहेत. परंतु आता सत्तेतील नेत्यांमध्येच यावरून कलगीतुरा पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण सत्तेतील काही भाजप नेते भुजबळांच्या भूमिकेला विरोध करत आहेत.
आता तर थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांवर टीका करत त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करत घरचा आहेर दिला आहे. ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी विचार करावा असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर मध्ये असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे मत प्रदर्शित केले.
*सरकारबाबतची विश्वासार्हता कमी होईल
मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरु केली आहे. तसेच कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजासाठी आरक्षण देण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करत आहे.
त्यामुळे भुजबळ हे मंत्री आहेत व ते जे काही बोलत आहेत त्यामुळे सरकारमध्ये एक वाच्यता नाही असा संदेश नागरिकांमध्ये जात आहे. व यामुळे सरकारबाबतची विश्वासार्हता कमी होते असे ते म्हणालेत.
* मंत्री भुजबळांनी संयम बाळगावा
ओबीसींच्या हक्कांचा मुद्दा पुढे करून जे आंदोलन सुरू आहे त्याची कसलीही आवश्यकताच नव्हती. यामुळे कारण नसताना दोन समाजांत तेढ निर्माण होत असल्याचे मंत्री विखे म्हणाले. हा वाद निरर्थक असून मंत्री भुजबळांनी संयम बाळगावा व त्याचीच गरज असल्याचेही ते म्हणाले.
* आज लोक आदराने बोलतायेत, पण..
आज मंत्री भुजबळांबाबत लोकं आदराने बोलत आहेत. पण पुढे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल असे विखे पाटील म्हणाले. सध्या दोन समाजात वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विनाकारण इतर गोष्टी करण्यापेक्षा संयम पाळणे गरजेचे असल्याचे विखे म्हणाले.