Ahmednagar Politics : आता ‘त्यांना’ असं वाटू लागलंय की, हे राज्य आपणच चालवतोय की काय?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आता ‘त्यांना’ असं वाटू लागलंय की, हे राज्य आपणच चालवतोय की काय? प्रशासनास धाक दाखवायचा, प्रशासनाचे लोक बळंच दडपशाही करून उभे करायचे आणि सांगा लोकांना,

आमची कामगिरी! तुमचे काम आहे ना, तुम्ही मंजुर केले आहे ना, तुम्ही नारळ फोडा, आम्ही येणारही नाही.

नीलेश लंके कधी दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूरची स्वप्ने पाहत नाही. मी काम मंजूर केलंय, तर मीच नारळ फोडणार, तुम्ही मंजुर केले, तर तुम्ही फोडा, असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता टोला लगावला.

शिंगवे नाईक व नांदगाव येथील विविध विकासकामांचा शुभारंभ आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, सरपंच सखाराम सरक, सेवा संस्थेचे चेअरमन नंदकुमार सोनवणे, सरपंच बाबा काळे आदी उपस्थित होते.

आ. लंके म्हणाले, की माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही तुमच्या साडेचार वर्षांतील कामाचा लेखाजोखा समोरासमोर घेऊन बसा कागदोपत्री. मी माझ्या कामाचा लेखाजोखा घेऊन समोरासमोर बसतो.

काहीतरी बातम्या छापून आणायच्या, जिल्हा परिषदेच्या प्रशासकिय मंजुऱ्या घेऊन जायच्या आणि सांगायचे हे काम तुझ्या गावचं, जिल्हा परिषदेचा आणि तुमचा काय संबंध? जिल्हा परिषदेशी प्रताप पाटलांचा, बाळासाहेब हराळांचा, संदेश कार्ले, मोकाते अण्णा यांचा संबंध आहे. तुमचा काडीचाही सबंध नाही,

तरीही सांगायचे आम्ही काम केले. नगर-मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लंके म्हणाले, की मधल्या काळात कुठेतरी कामाला सुरूवात झाली, मात्र ते कामही बंद झाले. तुम्ही ज्या रस्त्याने घरी जाता, तो रस्ता तरी करा ना अगोदर! मग दुसऱ्यांना उपदेशाचे डोस पाजा, असा टोला लंके यांनी लगावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe