Governor of Maharashtra : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
असे असताना आता १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी होणार आहे. नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. यामुळे आता त्यांच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आदी महापुरुषांचा अवमान केल्यामुळे कोशारी अडचणीत आले होते. यामुळे राज्यातील जनतेने चीड व्यक्त करत राज्यपालांचे पुतळे जाळले होते. अनेक ठिकाणी निदर्शने आणि आंदोलनेही होत होती.
त्यामुळे राज्यपालांना अखेर पायउतार व्हावे लागले होते. यामुळे याठिकाणी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.
अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.