राशीन : कर्जत तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान बऱ्याच दिवसांपासून रखडले होते. राशीन (ता. कर्जत) येथील जगदंबा डेअरीने शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या फायली शासनाकडे पाठवल्या होत्या.
पण ११ कोटी रुपयांची ही रक्कम मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा करूनही पैसे हाती लागत नव्हते. अखेर विधान परिषदेचे सभापती आमदार प्रा. राम शिंदे यांनी फक्त एक फोन केला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात आठ कोटी रुपये जमा झाले.

जगदंबा डेअरीमार्फत कर्जत तालुक्यातून दररोज सुमारे दीड लाख लिटर दूध गोळा केले जाते. या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जानेवारी २०२४ पासून शासनाने जाहीर केलेले ५ रुपये प्रति लिटरप्रमाणे सहा महिन्यांचे अनुदान मिळण्यात अडचणी येत होत्या.
खासगी डेअरी चालकांना हे अनुदान आधीच मिळाले होते, पण जगदंबा डेअरीच्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते. यासाठी डेअरीचे अध्यक्ष नारायण जगताप यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेतली आणि हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. शिंदे यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून हा विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले.
त्यामुळे कर्जत तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात आठ कोटी रुपयांचे अनुदान जमा झाले. उरलेली रक्कमही लवकरच मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने जगदंबा डेअरी फार्मवर सभापती प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डेअरीचे अध्यक्ष नारायण जगताप यांनी उपस्थित दूध उत्पादकांना ही आनंदाची बातमी सांगितली.
या कार्यक्रमाला शहाजीराजे भोसले, धनंजय मोरे, विलास काळे, डेअरीचे संचालक विकी जगताप, विश्वास काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांतीलाल कोपनर, शेखर खरमारे यांच्यासह तालुक्यातील दूध संकलन केंद्रांचे चालक उपस्थित होते.