Panjabrao Dakh News : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचारसभांचा धुमाकूळ सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत आमने-सामने आहेत.
दोन्ही गटातील फायर ब्रँड नेत्यांच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. प्रचार सभांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला जात आहे. खरे तर राज्यातील प्रमुख दोन पक्ष अर्थातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.
त्यामुळे या विधानसभा निवडणुका खूपच लक्षवेधी ठरत असून अशा या वातावरणातच मराठवाड्यात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामान अंदाजासाठी लोकप्रिय असणारे हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी अनेकांचे अंदाज चुकवत आज एक मोठा मास्टर स्ट्रोक लगावला आहे.
पंजाब रावांनी थेट भारतीय जनता पक्षात सामील होण्याचा मोठा निर्णय आज घेतलाय. खरे तर लोकसभा निवडणुकीत पंजाब रावांनी आपले नशीब आजमावले होते. परभणी लोकसभा मतदारसंघातून पंजाबरावांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेत आपल्या राजकारणाची सुरुवात केली. पण विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पंजाब रावांनी आपल्या राजकारणाला एक वेगळे वळण दिले आहे.
त्यांनी आज अनेकांचे अंदाज चुकवत अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात पंजाबरावांच्या या पक्ष प्रवेशाची मोठी चर्चा सुरू आहे. ते आता विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विद्यमान आमदार मेघना बाेर्डीकर यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.
पंजाब रावांच्या या पक्षप्रवेशामुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. पंजाबरावांची लोकप्रियता ही महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे. त्यांच्या हवामान अंदाजावर लोकांचा गाढा विश्वास आहे. एक वेळ शेतकरी बांधव हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवणार नाहीत मात्र पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर शेतकरी अधिक विश्वास दाखवतात, असे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते.
ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले हवामान अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. त्यांचे व्हाट्सअपचे हजारो ग्रुप ॲक्टिव्ह असून त्या ग्रुपच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांसमवेत आपला अंदाजच सामायिक करत असतात. याशिवाय त्यांचा अधिकृत youtube चैनल देखील आहे त्या यूट्यूब चैनलवरही ते आपला अंदाज देतात.
यामुळे लोकसभा निवडणुकीत पंजाबरावांना वंचित कडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण आता त्यांनी आपल्या राजकारणाची एक नवीन इनिंग सुरू केली आहे.
आज भाजपा नेते रामप्रसाद बाेर्डीकर यांच्या हस्ते पंजाबराव डख यांनी भाजपात अधिकृतरित्या प्रवेश करत हाती कमळ घेतले आहे. त्यामुळे सध्या मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात पंजाबराव डख हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
ऐन निवडणुकीच्या ताेंडावर त्यांनी भाजपात प्रवेश करून निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले आहे. आता ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार मेघना बाेर्डीकर यांचा प्रचार करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत वंचितने त्यांना उमेदवारी दिली होती मात्र पंजाबरावांनी वंचितचा अंदाज चुकवत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय.