पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तणाव ! शिरसाठवाडी गावात आ. मोनिका राजळेंच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

आज राज्यात अनेक ठिकाणी मतदानादरम्यान तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना विद्यमान आमदार कांदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी मधूनही आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदानानंतर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शिरसाठवाडी गावात मोठा गोंधळ आणि तणाव पाहायला मिळाला.

Tejas B Shelar
Published:
Pathardi News

Pathardi News : आज महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता साऱ्यांना 23 तारखेची अर्थातच मतदानाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. कोणती आघाडी म्हणजेच महाविकास आघाडी की महायुती कोण 145 आमदारांचे संख्याबळ गाठणार याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष असेल.

दरम्यान, आज राज्यात अनेक ठिकाणी मतदानादरम्यान तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना विद्यमान आमदार कांदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.

दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी मधूनही आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदानानंतर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शिरसाठवाडी गावात मोठा गोंधळ आणि तणाव पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार या गावातील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आमदार मोनिका राजळे कार्यकर्त्यांसह आल्या होत्या.

पण, केंद्रात भेट देण्यासाठी गेल्या असता गावातील तरुणांनी राजळे यांच्याबरोबर असलेल्या काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे गावात तणावाची स्थिती तयार झाली, म्हणून या गावात एकच खळबळ उडाली आहे.

गावात सगळीकडे तणावाची परिस्थिती तयार झाली असल्याने पोलीस देखील ॲक्शन मोडवर आलेत. गावात परिस्थिती एवढी बिकट झाली होती की आमदार राजळे यांना एका बंद खोलीत बसवावे लागले.

दरम्यान, पोलिसांची कुमक कमी असल्याने अन गावातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता एक मोठा पोलीस फौजफाटा मागवला गेला. गावात पोलीस फौज फाटा दाखल झाल्यानंतर शिरसाठवाडी गावातून आमदार मोनिका राजळे यांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. राजळे पोलीस संरक्षणात बाहेर आल्या आहेत.

पण, या घटनेमुळे पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमा झाले आहेत. दरम्यान, आमदार मोनिका राजळे या पोलीस ठाण्यात येण्याची शक्यता येथील भाजपा कार्यकर्त्यांकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे, या प्रकरणात आता पुढे काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe