मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण लागू करावे !

Updated on -

Maharashtra News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे.

त्यांच्या समर्थनासाठी कोपरगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील साखळी उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजबांधवांची संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी भेट घेऊन तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणाला पाठिंबा दिला.

आपण सदैव मराठा समाजासोबत असून, सरकारने मराठा समाजाला न्यायालयात कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण तातडीने देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी कोल्हे पती-पत्नी या उभयतांनी केली आहे.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रकृती सध्या ठिक नसल्याने त्यांनी काल मंगळवारी (दि.३१) भ्रमणध्वनीवरून या उपोषणकर्त्यांशी संपर्क साधून उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. बिपीन कोल्हे यांनी काल मंगळवारी सायंकाळी उपोषणकर्ते विनय भगत, अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, अमित आढाव, सुनील साळुंके यांच्याशी चर्चा केली.

यावेळी बाळासाहेब नरोडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, दिलीप दारुणकर, राजेंद्र सोनवणे, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, बबलू वाणी, संजय जगदाळे, नसीर सय्यद, विवेक सोनवणे, अबुजर शेख, रवींद्र रोहमारे, संतोष साबळे, प्रा. दत्तात्रय गाढे, प्रा. बाळासाहेब वडांगळे, प्रा. गिरमकर, मुन्ना दरपेल, रोहन दरपेल, राजेंद्र डागा, साई नरोडे, दीपक पंजाबी, रुपेश सिनगर आदींसह मराठा समाजबांधव, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गोरगरीब मराठा समाजाला सरकारने इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीर चौकटीत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊन न्याय द्यावा.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व राज्याच्या इतर भागातील मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळत आहे; पण मराठवाड्यातील मराठा समाजबांधव आरक्षणापासून वंचित आहेत.

राज्य सरकारने आता त्यांचा संयम न पाहता तात्काळ राज्यातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण लागू करावे, असे आवाहन बिपीन कोल्हे यांनी केले.

कोल्हे कुटुंबीय नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती आपण राज्य सरकारकडे केली आहे.

सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊन निश्चितच न्याय देईल. त्यामुळे मराठा कुटुंबातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करू नये. तसेच शांततेत सुरू असलेल्या या लढ्याला कोणीही गालबोट लागेल असे कृत्य करू नये, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe