Ahmednagar Politics : स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा खा.कोल्हेंचे आ. लंकेंना साकडे !

Ahmednagar Politics : महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजावी, अशी अपेक्षा करीत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आ. नीलेश लंके यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी साकडे घातले.

नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या शेवटच्या प्रयोगानंतर खा. कोल्हे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मा. आ. राहुल जगताप, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, शशिकला राठोड, शरद झोडगे, राजेंद्र पिपाडा, डॉ. सुधा कांकरिया, संदेश कार्ले,

नितीन धांडे, राणा प्रताप पालवे, विक्रम राठोड, माजी महापौर सुरेखा कदम, अशोक कानडे, अंबादास शिंदे, बाबासाहेब भिटे, वैशाली टेके, राजू शेटे, बाळासाहेब हराळ, गिरीष जाधव, दिलीप झिंजुर्डे, राजेंद्र भगत, विजय पठारे,

सिताराम काकडे मच्छिद्र सोनवणे, धनराज गाडे, नितीन बाफना, सुधाकर मुसमाडे, रामदास बाचकर, किरण कडू यांच्यासह लाखोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. महानाट्यादरम्यान प्रियांका शेळके पाटील यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली.

आ. लंके यांच्या सामाजिक कार्याचा मला कायम अभिमान वाटत असल्याचे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले, कुठलीही राजकिय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटूंबातील माणसं जनतेच्या काळजावर आपले अधिराज्य गाजवतात, त्याचा अभिमान प्रत्येकाला वाटतो. या महानाटयास प्रतिसाद दिल्याबद्दल नगरकरांप्रती कोल्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

लाखोंच्या संख्येने दररोज प्रेक्षक असताना ज्या पध्दतीने आ. लंके यांच्या नेतृत्वाखाली जे नियोजन केले, ते खरोखर वाखाणण्यासारखे होते, असे सांगत कोल्हे यांनी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या सदस्यांचे कौतुक केले.