ठाकरे कुटुंबाला दहशतीत आणण्यासाठी राजकीय षडयंत्र; थोरातांनी उघड केला मोठा गौप्यस्फोट!

Published on -

अहिल्यानगर: दिशा सालियान प्रकरणातून राजकारणाचा स्तर किती खालावला आहे, हे स्पष्ट दिसत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

ठाकरे कुटुंबाला दहशत निर्माण करण्यासाठी हे प्रकरण वारंवार उकरून काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शुक्रवारी (२१ मार्च २०२५) अहिल्यानगर येथे माध्यमांशी बोलताना थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ उपस्थित होते.

थोरात म्हणाले, “राजकारणात मतभेद असू शकतात, पण ते तत्त्वावर आधारित असावेत. एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत राजकारण गेले, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.

दिशा सालियान प्रकरण हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ठाकरे कुटुंबावर दहशत निर्माण करण्यासाठीच हे प्रकरण पुन्हा पुन्हा समोर आणले जात आहे.” त्यांनी या प्रकरणाच्या राजकीयी वापरावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

थोरात यांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “जगातील अनेक देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत, पण आपल्या देशात दंगली आणि तणाव निर्माण होत आहे हे दुर्दैवी आहे.

समाजात शांतता आणि आनंद राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यात दंगली होत असल्याचे अभिमानाने सांगणार आहात का? अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेला राजधर्म सरकारने पाळला पाहिजे.” त्यांनी सरकारला शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला दिला.

गुन्हेगारीच्या मुद्द्यावर बोलताना थोरात म्हणाले, “गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. त्याची जात, धर्म पाहिला जाऊ नये. गुन्हेगाराची एकच जात असते, ती म्हणजे गुन्हेगारी. त्यामुळे त्याला शिक्षा देण्यात भेदभाव होता कामा नये. राज्यात शांतता निर्माण करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe