कोपरगाव येथे नुकताच एक कार्यक्रम पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव उपबाजार आवार मोर्विस (धामोरी फाटा) येथील जागेच्या भूमिपूजनाचा हा सोहळा होता. नववर्षांच्या अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशीच याचे भूमिपूजन झाले.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. परंतु हा सोहळा जरी भूमिपूजनाचा असला तरी काही महत्वाच्या घडामोडी घडल्यात. राजकीय शत्रू अर्थात काळे-कोल्हे, कोल्हे-परजणे, कोल्हे-विखे हे एकत्रित येण्याच्या हालचाली सुरु झाल्यात अशा घडामोडी या कार्यक्रमात घडल्यात. स्वतः बिपीन कोल्हे यांनी काळे-कोल्हे यांनी एकत्रित यावं असं वक्तव्य केलंय.

आधी एकदा घडलं काय ते एकदा पाहुयात…
हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमात एकाच स्टेजवर बिपीन कोल्हे, आ.आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, पोहेगाव नागरी पतसंस्था चेअरमन नितीनराव औताडे आदींसह दिग्गज मंडळी होती.
यावेळी बिपीन कोल्हे यांनी वक्तव्य केले की, त्यांचा जोर पाणीप्रश्नावर होता. ते म्हणाले, राजकीय नेत्यांनी एकोपा दाखवत स्व.कोल्हे साहेब आणि स्व.काळे साहेब यांच्या प्रमाने एकत्र येऊन मतदारसंघाच्या पाणी प्रश्नासाठी लढणे गरजेचे आहे.
आमचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सुरू आहेतच मात्र विधानसभेत आ.काळे यांनी तर राजेश परजने यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरून कोपरगावचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करावेत. जेथे आवश्यकता लागेल तेथे आम्ही स्वतः तुमच्यासोबत येऊ. पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.
एकत्रित येतील?
दरम्यान आता बिपीन कोल्हे यांनी स्व.कोल्हे साहेब आणि स्व.काळे साहेब यांच्या प्रमाने एकत्र येण्याचे वक्तव्य केले त्यावरून आता काळे-कोल्हे यांचा वाद मिटून एक नवा अध्याय येथे घडेल का? अशा चर्चा सुरु झाल्यात. तसेच विवेक कोल्हे यांनी शिर्डीत सुरु झालेल्या नाईट लँडिंगचे कौतुक केले. अप्रत्यक्ष त्यांनी विखेंचेच कौतुक केले.
उत्तरेत आता काळे-कोल्हे-विखे यांची एकत्रित घडी बसेल अशी चर्चा सुरु झालीये. वरती महायुती सरकार आहे, त्यामुळे कोल्हे यांना सामंजस्याने घ्यावेच लागेल. तसेच कोल्हे यांना पुनर्वसन करायचे असेल मग विधानपरिषद असो की राज्यसभा त्यासाठी विखेंशी दुश्मनी त्यांना आता परवडणारी नाही.
तसेच भविष्यातील म्हणजे आगामी लोकसभेसाठी सर्वांची एकत्रित मोट बांधणे हे विखेंसाठी कधीही फायदेशीरच ठरेल. त्यामुळे आता विखे-काळे-कोल्हे यांच्या एकत्री करणासाठी कोल्हे यांनी सुरवात केलीये का? असा प्रश्न सर्वसामान्यंना पडलाय.