अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा तसेच रांजणगांव गणपती येथील औद्योगीक वसाहती त्या अनुषंगाने या मार्गावर वाढलेली वाहतूक व वारंवार होणारी वाहतूकीची कोंडी लक्षात घेऊन नगर-पुणे ग्रीनफिल्ड महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व खासदार नीलेश लंके यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून या महामार्गासाठी मंत्री गडकरी हे अनुकूल आहेत.
हा महामार्ग केवळ पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणारा नसून अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हयाशी थेट आणि सुलभ संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आवष्यक पावले उचलणे गरजेचे असल्याचे खा. लंके यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

या महामार्गामुळे अहिल्यानगर मतदारसंघातील उद्योग, कृषी, पर्यटन आणि व्यापारी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक भागांतून पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी मोठा वेळ लागतो. नव्या महामार्गामुळे हा प्रवास अधिक वेगवान आणि सोईस्कर होईल. त्यामुळे शेतकरी, व्यवसायिक आणि स्थानिक उद्योजक यांना मोठा फायदा होणार असून नवीन गुंतवणूकीसाठी मार्ग मोकळा होणार आहे.
ग्रामीण भागालाही फायदा व्हावा
ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प राबविताना अहिल्यानगर जिल्हयातील मुख्य भागांना या महामार्गाशी थेट जोडण्यासाठी स्वतंत्र इंटरचेंज आणि कनेक्टिव्हिटी उपाययोजनांची यावेळी मंत्री गडकरी यांच्याकडे खा. लंके यांनी मागणी केली.
महामार्गामुळे केवळ मोठी शहरेच नव्हे तर ग्रामीण भागालाही फायदा व्हायला हवा अशी स्पष्ट भुमिका खा. लंके यांनी मांडली. त्यावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्यांचा विचार करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही खा. लंके यांना दिली.
संसदेतही विषय मांडणार
मंत्री नितीन गडकरी व खासदार नीलेश लंके यांची ही भेट केवळ महामार्गाच्या दृष्टीनेच नव्हे तर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील एकूणच विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरली. खा. लंके यांनी हा विषय संसदेतही पुढे नेण्याचा निर्धार केला असून हा महामार्ग जिल्हयाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही खा. लंके यांनी व्यक्त केला.