मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये मोठा वाद सुरु आहे. शिंदे गटाने दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता शिवसेनेतच राहून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. मात्र आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ठाकरे गटाच्या हातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे निर्देश देखील दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. जब “खोने”के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र !., असे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.