Maharashtra News : राज्यातील सरकारची सध्याची परिस्थिती ‘एक फुल तर दोन डाऊटफुल सरकार’ अशी आहे. राज्यातील या पक्षांच्या एकाही खासदाराने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत तोंड देखील उघडले नाही.
केंद्रात तसेच राज्यातील सरकारने सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी केली आहे. प्रभू श्रीराम एकवचनी होते पण त्यांच्या नावाने राजकारण करणारे एकवचनी नाहीत अशी टिका खासदार अमोल कोल्हे यांनी केली. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे ते बोलत होते.
यावेळी कोल्हे यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. साखर वाटायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कांदा निर्यात बंदीबद्दल संसदेत तोंड उघडले नाही, असा टोला खासदार सुजय विखे यांना लगावला. टोमॅटोचे भाव वाढले की टोमॅटो नेपाळवरून आणले, कापूस ऑस्ट्रेलिया वरून मागितला.
पाकिस्तान विरोधात आगपाखड करणाऱ्या सरकारला पाकिस्तानचा कांदा चालतो पण येथील शेतकऱ्यांचे सरकारला देणे घेणे नाही. संसाराला हातभार लावणाऱ्या दूध धंद्यातील दुधाचे दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी सन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये वर्षाला द्यायचे.
अन् खतावरील जीएसटी मधून वर्षभर शेतकऱ्यांना लुटायचे काम सरकार करत आहे. फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री असून राज्य सरकार देखील सुड बुध्दीने वागत आहे. निधी देताना अन्याय केला जात आहे. सात डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी केली महिना झाला तरी राज्यातील एकही खासदार बोलायला तयार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. सरकार सातत्याने शे तकरी विरोधी भूमिका घेत असल्याची टीका कोल्हे केली.
आमदार तनपुरे यांनी बोलताना सांगितले की, आमच्या कामांचे श्रेय घेण्याचा उद्योग विरोधक करत आहेत. पिंपळगाव येथील सबस्टेशन आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाले. सब स्टेशन ज्या योजनेतून मंजूर झाले ती योजना आघाडी सरकारनेच अंमलात आणली.
त्या योजनेत दोन हजार कोटी रुपये शिल्लक असताना फडणवीस यांनी योजना बंद केली. यावर विधानसभेत गोल गोल उत्तरे दिली जातात. संसद रत्न खासदार अमोल कोल्हे यांचे निलंबन हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्ष अस्तित्वात ठेवायचाच नाही असा एककलमी कार्यक्रम केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे.