Pradyut Bora : दिल्लीतून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली..
त्यांच्या आत्मकेंद्री आणि व्यक्तिकेंद्रित कार्यशैलीवर त्यांनी टीका केली होती. २०१५ साली भाजपातून बाहेर पडत त्यांनी स्वतःची लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी स्थापन केली होती. यामुळे आता याचा भाजपला तोटा होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्याची वेळ आली आहे.
आपल्या राष्ट्रपित्यांनी जो आयडिया ऑफ इंडियाचा विचार मांडला होता, तो वाचविण्याची आता गरज निर्माण झाली आहे. काँग्रेसमधील बहुसंख्य नेत्यांना असे वाटते की, ही एक मोठी लढाई आहे. जी मोठ्या व्यासपीठावरून लढली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले.
तसेच आम्ही पक्ष स्थापन केला तेव्हा सर्वच पक्षांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याला आता आठ वर्षे झाली आहेत. आता वैयक्तिक गोष्टी बाजूला सारत एका मोठ्या उद्देशासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आता आम्ही राजकीय वास्तव स्वीकारून काँग्रेससोबत हातमिळवणी करत आहोत. येणारी लोकसभा निवडणुक आम्ही मोठ्या तयारीने लढणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.