Free Ration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पेशल गिफ्ट ! आणखी पाच वर्षे मोफत रेशन

Ahmednagarlive24 office
Published:
Free Ration

Free Ration : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली मोफत रेशन धान्याची योजना अजून पाच वर्षे म्हणजे २०२८ सालापर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील प्रचारसभांमध्ये केली. ८० कोटी गरीब लोकांसाठी ही दिवाळी भेट असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी मोदींनी छत्तीसगडच्या दुर्ग आणि मध्य प्रदेशातील रतलाम येथे प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांमध्ये मोदींनी पीएम गरीब कल्याण अन्न योजना डिसेंबरनंतर अजून पाच वर्षे सुरू राहणार असल्याचे सांगितले.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रेशन दुकानांवर महिन्याला पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळतो. कोरोना महामारीच्या काळात ३० जून २०२० रोजी सरकारने ही योजना सुरू केली होती. देशातील ८० कोटी लोक या योजनेचे लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.

छत्तीसगडमधील सभेत मोदींनी सत्ताधारी काँग्रेसवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गत पाच वर्षांत २ हजार कोटींचा मद्य घोटाळा, ५०० कोटींचा सिमेंट घोटाळा ५ हजार कोटींचा तांदूळ घोटाळा, १३०० कोटींचा गौठान घोटाळा, ७०० कोटींचा डीएमएफ घोटाळा केला.

छत्तीसगडला लुटण्यात काँग्रेसने कोणतीही कसर ठेवली नाही, असा आरोप मोदींनी केला. तसेच राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व घोटाळ्यांची कसून चौकशी करून जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. भ्रष्टाचार करून स्वतःचे खिसे भरणे हीच काँग्रेसची रणनीती आहे. काँग्रेसने नेहमीच गरीबांचा विश्वासघात केला आहे, असे मोदी म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe