बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत रंगणार !

Published on -

Pune News : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः युवा नेते युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीच्या तयारीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, ते स्वतः निवडणूक लढणार की नाही, याचा निर्णय शरद पवार यांच्या सूचनेनंतर घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा थरार महाराष्ट्राने अनुभवला. लोकसभेत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला, तर विधानसभेत अजित पवार यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आता माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांचे राजकीय बळकटीकरण

बारामती तालुक्यातील माळेगाव, सोमेश्वर हे सहकारी आणि अंबालिका, दौंड शुगर हे खासगी साखर कारखाने अजित पवार यांच्या प्रभावाखाली आहेत. या कारखान्यांमुळे त्यांचे राजकीय बळ अधिक मजबूत झाले आहे. हे चारही कारखाने आज चांगल्या आर्थिक स्थितीत असून, साखर उत्पादन, इथेनॉल निर्मिती आणि गाळप क्षमतेत राज्यात आघाडीवर आहेत.

माळेगाव कारखान्याची निवडणूक महत्त्वाची का?

माळेगाव कारखान्यावर पूर्वी सहकार क्षेत्रातील जाणकार आणि भाजपचे माजी नेते चंद्रराव तावरे तसेच माजी अध्यक्ष रंजन काका तावरे यांचे नियंत्रण होते. मात्र, नंतर हा कारखाना अजित पवार यांच्या हाती गेला. सध्या या कारखान्याचे 19,549 सभासद असून, बारामती तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये या कारखान्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळेच शरद पवार गटाने या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचे ठरवले आहे. ही निवडणूक स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडींना चालना देऊ शकते. अजित पवार विरुद्ध शरद पवार गट यांच्यातील ही निवडणूक कोणत्या दिशा घेईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe