Ahmednagar Politics : आगामी लोकसभेचे पडघम वाजायला आता सुरवात झालीये. याच अनुशंघाने आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून माजी जिल्हा परिषद सदस्य व आ. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे.
३ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान ही यात्रा असणार असून पाथर्डी येथील मोहटादेवी मंदिरापासून याची सुरवात झालीये.
शिवाजी महाराजांचे विचार नगर जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवस्वराज यात्रा जरी सुरू करण्यात आली असली तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी त्यांची ही तयारी मानली जात आहे. राणी लंके यांच्या शिवस्वराज्य यात्रेस पाथर्डी, कर्जत, जामखेड, शेवगाव, श्रीगोंदा या तालुक्यातील गावागावात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात ही यात्रा जात असून प्रत्येक गावात शिवव्याख्याते छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांसमोर मांडणार आहेत. १५ जानेवारीला शिवस्वराज्य यात्रेचा समारोप, नगर येथे आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून स्थानिक विकासाचे प्रश्न व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे.
लोकसभेसाठी भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होईल असे चित्र आहे. आगामी लोकसभेचा सामना हा आमदार निलेश लंके व खासदार विखे पाटील यांत रंगेल असेच सध्या दिसते.
‘या’ तालुक्यातून मोठा प्रतिसाद
सध्या राणी लंके यांच्या या यात्रेस पाथर्डी, कर्जत, जामखेड, शेवगाव, श्रीगोंदा या तालुक्यांतून मोठा प्रतिसाद दिसत आहे. त्यामुळे आता सध्या या तालुक्यांत विखे याना मताधिक्य होते. त्यामुळे येथे लंके यांची वाढलेली लोकप्रियता विखे यांच्यासाठी चिंताजनक ठरू शकते.
नागवडे यांचा लंकेंना होईल फायदा?
श्रीगोंदा तालुक्यातील प्रमुख नेते राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे हे सध्या अजित पवार यांच्या संपर्कात असून अजित पवार गटात जाण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या ताकदीचा उपयोगही लंके याना लोकसभेला होऊ शकतो असे मानले जाते.