Rahul Gandhi : कसबा निवडणूक जिंकण्यासाठी आता राहुल गांधी मैदानात, उमेदवाराला थेट दिल्लीतून फोन..

Published on -

Rahul Gandhi : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने निवडणूक बिनविरोध करावी यासाठी प्रयत्न केले. असे असताना आता महाविकास आघाडीचे नेते बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच कसब्यातून कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट राहुल गांधींचा फोन आला आहे.

यामुळे आता महाविकास आघाडीने मोठ्या ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे दिसून येते. या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात राहुल गांधींनी या निवडणुकीत लक्ष घातल्याचे समोर आले आहे. कसब्यात रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता.

ते म्हणाले होते की, काहीही झालं तरी मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. पक्षाने माझा विचार केला नाही मी पक्षाचा विचार का करु?, अशी ठाम भूमिका बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली होती. त्यानंतर अचानक आज दाभेकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे काँग्रेसचे टेन्शन कमी झाले.

दरम्यान, पहिल्यांदा आक्रमक होऊन परत दाभेकरांनी उमेदवारी अर्ज मागे का घेतला किंवा कोणामुळे घेतला, अशा चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्या चर्चेला दाभेकरांनीच पूर्णविराम दिला आहे. मला थेट राहुल गांधी यांचा फोन आला आणि त्यांच्या फोनमुळे मी उमेदवारी अर्ज मागे घेऊन आता कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तुम्ही कॉंग्रेसचे अनेक वर्षांपासून काम केले आहे. आता पक्षासाठी आणि माझ्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्या, पक्ष मोठा करण्यासाठी आपण भारतभर भारत जोडो यात्रा काढली होती. आपल्याला पक्ष मोठा करायचा आहे. कॉंग्रेस म्हणून एकत्र लढायचे आहे. त्यामुळे तुमची यासाठी साथ गरजेची आहे, असे राहूल गांधी यांनी म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe