Rahul Kul : गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाना चर्चेत आला आहे. या कारखाण्याचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 500 कोटीचे आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
आता भीमा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सभासदांसमोर येण्याकारिता श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे, अशी मागणी भाजप (BJP) किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा कारखान्याचे माजी संचालक वासुदेव काळे यांनी केली. यामुळे आता राहुल कुल यांची कोंडी झाली आहे.
वासुदेव काळे म्हणाले, तीन गळीत हंगाम बंद राहिलेला भीमा सहकारी साखर कारखाना खासगी कंपनीस चालविण्यात देण्यात आला आहे. मात्र, तो सहकारी साखर कारखाना राहावा, ही भूमिका आणि अपेक्षा आमची आहे.
राहुल कुल हे स्वपक्षाचे आमदार असले तरी अध्यक्ष म्हणून मी त्यांना यापूर्वी देखील कारखान्याच्या आर्थिक स्थिती व धोरणांविषयी सतत प्रश्न केले आहेत. परंतु ठोस उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आपण कारखान्याच्या निवडणुका लढवून सभासदांची बाजू मांडलेली आहे. कारखान्याची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे व त्याला कोण जबाबदार आहे , हे समजून घेण्याकरिता श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असेही काळे म्हणाले.
कारखान्यावर झालेल्या कर्जाविषयी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून मी सातत्याने विचारणा केली आहे. उसाचे वाढते क्षेत्र, उसाची गुऱ्हाळे, सहवीजनिर्मिती आणि आसवनी प्रकल्प, गाळप क्षमता, ऊस दराची स्पर्धा, आदींचा विचार करून कारखान्याचे नियोजन आणि व्यवस्थापन झाले पाहिजे, असेही काळे यावेळी म्हणाले.