Rahuri Politics News : सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. प्रचार तोफांचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. दोन्ही गटातील फायर ब्रँड नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झगडताना पाहायला मिळत आहेत.
एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील एक हायप्रोफाईल मतदारसंघ असून या ठिकाणी देखील महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून जोरदार प्रचार सुरू आहे.
या ठिकाणी महाविकास आघाडी कडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे महायुतीकडून या जागेवर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले मैदानात आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांच्यावर जहरी टीका करत त्यांना पुतना मावशीची उपमा दिली आहे. वाघाचा आखाडा, तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव येथे नुकतीच आमदार तनपुरे यांची जाहीर सभा झाली.
या प्रचार दौऱ्यात आमदार तनपुरे यांनी, कोरोना काळात जनतेचे प्राण वाचवायला जीवाची पर्वा न करता झपाटून काम केले. पण, त्यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले स्वतःचा जीव वाचवून घरात बसले होते.
त्यांना मागील निवडणुकीत दहा वर्षांच्या निष्क्रिय कारभारामुळेचं जनतेने नाकारले आहे. यावेळी बोलताना आमदार तनपुरे यांनी असे म्हटले की, ‘ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मंजूर कामांना स्थगिती देण्याचे पाप महायुती सरकारने केले.
रस्त्यावर संघर्ष करून, उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयामार्फत स्थगिती उठविली. त्यामुळे रस्त्यांची कामे मार्गी लागली. कर्डिलेंनी दहा वर्षांत एक विद्युत रोहित्र दिले नाही. पण मी ऊर्जा राज्यमंत्री असतांना मतदारसंघात ४०० रोहित्र दिले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी नवीन सौर ऊर्जा कृषी वाहिनी प्रकल्पांना मंजुरी दिली. नवीन वीज उपकेंद्र, जुन्या उपकेंद्रांची क्षमता वाढ, लिंक लाईनची कामे केलीत.’
10 वर्ष काहीच केले नाही म्हणून….
पुढे बोलताना आ. तनपुरे यांनी, महाविकास आघाडीने कोरोना काळात शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी केली होती. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते.
पण ते 50 हजाराचे अनुदान महायुती सरकारने दिलेले नाही. कोरोनात आदिवासी समाजाला किराणा सामानाचे किट व दोन हजार रुपये प्रति कुटुंब वाटप केले. राहुरीत कोरोना रुग्णांसाठी मोफत उपचार केंद्र उभारून हजारो गोरगरीब जनतेचे प्राण वाचविले.
त्यावेळी जीवाच्या भीतीने अडीच वर्षे घरात बसलेले कर्डिले महायुती सरकार आल्यावर बाहेर पडले. त्यांनी आमदार असतांना 10 वर्षे एकही भरीव काम केले नाही, म्हणूनचं मागील निवडणुकीत जनतेने नाकारले.
मात्र निवडणुका जवळ आल्या असल्याने ते आता टीका करू लागले आहेत, असं म्हटल आहे अन कर्डिले यांचा खरपूस समाचार घेतलाय. आमदार तनपुरे यांनी, ते आता खोटे आरोप करून दिशाभूल करत आहेत. मात्र त्यांचा मुखवटा जनतेने चांगलाच ओळखला आहे.
पण, आता त्यांना मतदार थारा देत नाहीत. हेच कारण आहे की त्यांचे दलित, आदिवासी, सामान्य जनतेविषयी पुतना मावशीचे प्रेम उफाळले आहे. मात्र आता त्यांना मतदार भुलणार नाहीत. म्हणून त्यांना आता आपला पराभव साफ दिसू लागला आहे अन ते सैरभैर झाले असल्याची टीका यावेळी केली आहे.