Rahuri Vidhansabha Nivdnuk : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहिल्या नगर जिल्ह्यात मोठी उलथापालथ झाली होती. गत निवडणुकीत अनेक विद्यमान आमदारांचा पराभव झाला होता. राहुरी विधानसभा मतदारसंघात देखील गेल्या निवडणुकीत उलटफेर पाहायला मिळाला होता. प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता.
मात्र गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या कर्डीले यांच्यावर पुन्हा एकदा भाजपाने विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीतही कर्डिले यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. अर्थातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही राहुरी मध्ये कर्डिले विरुद्ध तनपुरे असाच पूर्वनिर्धारित सामना रंगणार आहे.
कर्डिले यांना भाजपाने आपल्या पहिल्याच यादीत उमेदवारी देऊन टाकलीय. त्यांनी उमेदवारांच्या स्पर्धेत नक्कीच बाजी मारली आहे. पण, गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला होता त्या तनपुरे यांचा सामना ते यंदा कसा करतील हा मोठा सवाल आहे.
तनपुरे यांच्या आव्हानांचा कर्डिले यांना सामना करताना चांगलाच कस लावावा लागणार आहे. दरम्यान आज आपण या निवडणुकीत कर्डिले यांच्यासमोर कोण कोणती आव्हाने राहणार आहेत अन तनपुरे यांच्या जमेच्या बाजू नेमक्या काय आहेत याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राहुरीत कर्डिले की पुन्हा तनपुरे
खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी कर्डिले यांची साथ सोडली आणि काँग्रेसचा हात जवळ केला. भाजपाचे युवक तालुका अध्यक्ष धीरज पानसंबळ यांनीही कर्डिले यांची साथ सोडत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यामुळे कर्डिले यांची मतदारसंघांमधील ताकद कमी झाली असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून वर्तवले जात आहे. फक्त हे दोनच जवळचे नेते त्यांना सोडून गेलेत असं नाही तर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी कर्डिले यांच्यापासून दुरावत आपला नवीन मार्ग शोधून काढलाय.
त्यामुळे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून विधानसभेचा गड लढवणे कर्डिले यांच्यासाठी आव्हानात्मक होणार आहे. मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कर्डिले यांचा जनसंपर्क काही अंशी कमी झाला आहे.
त्यातल्या त्यात त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षांसोबत सोयरीक जमवली आहे. केवळ ‘प्रवरे’च्या यंत्रणेवर विसंबून असलेले कर्डिले राहुरीत अपेक्षित नेतृत्व तयार करू शकले नाहीत असे मत जाणकारांकडूनही व्यक्त होत आहे.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव झाला अन कर्डिले यांची राजकीय ताकत अचानक कमी होऊ लागली. त्यांचे अनेक कार्यकर्ते आता तनपुरेंच्या ताफ्यात सामील झाले आहेत. आता त्यांना पुन्हा माघारी आपल्या गोट्यात आणण्याचे एक मोठे आव्हान कर्डिले यांच्यासमोर उभे राहिले आहे.
दुसरीकडे मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायती व सेवा सोसायट्यांवर आ. तनपुरे यांचे वर्चस्व आहे. आता ते वर्चस्व मोडीत काढण्याची कसरत कर्डिले यांना करावी लागणार आहे. शिवाय जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना डॉ. तनपुरे साखर कारखान्याची स्थिती हा मुद्दाही या निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार आहे. म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्याचे आव्हानही कर्डिले यांच्यासमोर असेल.
एकंदरीत भाजपने शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांना राहुरीचा गड परत मिळवण्यासाठी अडचणींचा डोंगर सर करावा लागणार आहे. यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा तनपुरे बाजी मारणार की कर्डिले कमबॅक करणारे हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सध्याच्या स्थितीला मात्र तनपुरे यांचा पाया भक्कम असल्याचे म्हटले जात आहे.