Rahuri Vidhansabha Nivdnuk : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून आता प्रचाराला सुरुवात झाली आहे.
दोन्ही गटातील ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे ते उमेदवारी अर्ज भरून प्रचाराचा नारळ फोडताना दिसत आहेत. राहुरी मध्ये देखील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला आहे.
राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज उमेदवारी अर्ज भरत प्रचाराला सुरुवात केली आहे. प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत.
म्हणून तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे तसेच जयंत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
प्राजक्त तनपुरे काय म्हटलेत?
विद्यमान आ. तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित सर्वांचे आभार मानलेत. तसेच, आज सर्वांनी जो उत्साह दाखवला, सभेच्या ठिकाणी आलात.
हे पाहता आपला विजय निश्चित आहे, यात शंकाचं नाही, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्यांनी आगामी 15-20 दिवस अविश्रांत परिश्रम घ्यायचे आहेत. लढाई जरी सोपी असली तरी, गाफील राहता कामा नये.
गावोगावी जावून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहे. 5 वर्ष तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रेमाने माझ्यावर विश्वास टाकलाय, यासाठी मी ऋणी आहे. आज पुन्हा मी जनता दरबारात आशिर्वाद मागण्यासाठी आलोय.
गत काही वर्षांमध्ये झालेल्या विकासकामांवर विचार करून आपण पुन्हा एकदा मला संधी द्याल, असे म्हणत तनपुरे यांनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
जयंत पाटील काय बोललेत?
तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना जयंत पाटील यांनी देखील त्यांचा विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणालेत की निळवंडे चे पाणी राहुरी तालुक्याला फक्त प्राजक्त दादांमुळेच मिळाले आहे.
आता राज्याला लवकरच एक उमदा नेता मिळणार आहे. तुमच्या आशीर्वादाने निलेश लंके हे लोकसभेत गेलेत आता तुम्ही प्राजक्त तनपुरे यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.