Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात आता लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेला कोण कोणती जागा लढवणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीमध्ये तर शिवसेनेने शिर्डी , अहमदनगर या दोन्ही जागांवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट हा देखील अहमदनगरसाठी इच्छुक आहे.
अहमदनगर दक्षिण मतदार संघ भाजपसाठी असेल पण तेथे उमेदवार खा. सुजय विखे असतील की, आ. राम शिंदे असतील हे अजून निश्चित नाही. अजित पवार गटाचे आ. निलेश लंके हे देखील फिल्डिंग लावून आहेत. दरम्यान आता आ. राम शिंदे व आ. निलेश लंके यांच्या नव्या वक्तव्याने मात्र चर्चांना पेव फुटले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ‘राम’ राज्य येणार असं वक्तव्य आ. शिंदे यांनी तर , आ.निलेश लंके या ‘रामाचे’ सारथी बनणार असं वक्तव्य आ. निलेश लंके यांनी केले आहे. त्यामुळे आता लोकसभेला विखे, लंके नव्हे तर राम शिंदेच असणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
काय म्हणाले आ. राम शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना झाली. त्यामुळे आता देशात रामराज्य अवतरलेले आहे. अशाच पद्धतीने नगर जिल्ह्यातही आता रामराज्य येणार आहे, असे सूचक भाष्य भाजप आमदार राम शिंदे यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा येथे मोठा यात्रोत्सव पार पडला.
या यात्रोत्सवात आ. राम शिंदे बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने त्यांची लोकसभा लढवण्याची सुप्त इच्छा पुन्हा एकदा दिसून आली. त्यांनी या आधीही खासदारकी लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली असल्याचे सर्वश्रुत आहेच. त्यादृष्टीने त्यांनी आ. निलेश लंके यांच्याशी साधलेली जवळीकता याकडे देखील राजकीय दृष्ट्याच पाहिले जाते.
आ. निलेश लंके म्हणतात ‘रामा’चा मी सारथी
आ. राम शिंदे यांच्या वरील वक्तव्याला आ. लंके यांनी आपल्या शैलीत पाठिंबा दिला. ते म्हणाले, आम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. एकमेकांविषयी आत्मीयता व प्रेम आहे. मोहटा देवीला जाताना योगायोगाने मी आ. शिंदे यांच्या गाडीचा चालक म्हणजे सारथी झालो व आता देशात रामराज्य आले असल्याने नगर जिल्ह्यातही रामराज्य यावे व त्या रामराज्याचा मी सारथी असावे, अशी प्रार्थना खंडेरायाकडे केली आहे.
माझ्या राजकीय जीवनातील अडचणीच्या वेळी प्रा. शिंदे यांनी मला मदत केली आहे, असेही आ. लंके यांनी आवर्जून स्पष्ट केले.
तसेच ते म्हणाले की, कोरोना काळातील कामगिरीमुळे फ्रान्सच्या विद्यापीठाने मला डॉक्टरेट दिली आहे. तसा मी डॉक्टर नसलो तरी वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया करू शकतो असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.