अहिल्यानगरमधील या नगरपंचायतीमध्ये बंडखोरी! मात्र नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरांमध्येच रस्सीखेच सुरू

कर्जत नगरपंचायतीत बंडखोरीनंतर नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. ११ नगरसेवकांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने सत्ता समीकरणे बदलली आहेत. छाया शेलार व रोहिणी घुले यांचे नाव आघाडीवर असून, निर्णयाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Published on -

कर्जत- ६ एप्रिल रोजी कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ आणि काँग्रेसचे ३ असे एकूण ११ नगरसेवकांनी बंड करत थेट भाजपसोबत हातमिळवणी केली. यामुळे विद्यमान नगराध्यक्षा यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या बंडखोरीनंतर संपूर्ण राजकीय समीकरणेच बदलली असून आता सर्वांचे लक्ष नव्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडीकडे लागले आहे.

रोहित पवारांचा किल्ला ढासळला

२०२१ मध्ये कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाने १७ पैकी १५ जागा जिंकून मोठा विजय मिळवला होता. मात्र, आताच्या बंडखोरीमुळे त्यांच्या गटाकडे केवळ ४ नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे एकेकाळी मजबूत असलेला गट आज अल्पमतात गेला आहे.

भाजपचे दोन नगरसेवक

भाजपकडे अवघे दोनच नगरसेवक असूनही बंडखोर ११ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांच्याकडे आता बहुमत आहे. त्यामुळे नव्या नगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र, बंडखोर गटातच सत्तेच्या वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

नगराध्यक्षपदासाठी महिलांची नावे चर्चेत

नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. त्यामुळे सध्या दोन नावांची प्रमुख चर्चा सुरू आहे. पहिलं नाव आहे छाया शेलार यांचं. राष्ट्रवादीतील बंडखोर नेते सुनील शेलार यांच्या पत्नी असून, त्यांनी पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत बंडखोरीत सक्रीय सहभाग घेतला होता. दुसरं नाव आहे रोहिणी घुले यांचं. त्या काँग्रेस नगरसेविका असून, भाजप नेते प्रवीण घुले यांच्या भावजयी आहेत. घुले हे या बंडाचे ‘किंगमेकर’ मानले जात आहेत.

अंतर्गत संघर्ष

पदाधिकारी निवडीत पूर्वी राऊत कुटुंबीयांकडे कारभाराच्या चाव्या देण्यात आल्या होत्या. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस गटात नाराजी निर्माण झाली होती. हीच नाराजी आता बंडाच्या रूपात बाहेर आली आहे. मात्र, बंडखोर गटातही पदवाटपावरून मतभेद आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी शेवटी कुणाला पसंती मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कर्जत नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार?

राजकीय सत्तांतर झाल्यानंतर कर्जत नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकेल, हे काही दिवसांत स्पष्ट होईल. बंडखोर गटाचे ११ नगरसेवक बहुमतात असले तरी अंतिमत: नगराध्यक्ष कोण होणार, हे आता पक्षीय गणित, गटबाजी आणि राजकीय समझोत्यांवर ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News