Ahmednagar Politics : लोकसभेसाठी सध्या सर्वच पक्षांनी आपल्या पद्धतीने राजकीय खेळी करण्यास सुरुवात केली असून त्यानुसार उमेदवारांसाठी आढावा घेतला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेची जागा मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे.
याचे कारण विखे यांना फाईट कोण देणार यावरून राष्ट्रवादीत सुरु असणारी चर्चा. राष्ट्रवादीकडून यासाठी विविध नावे समोर आणली जात आहेत. दरम्यान आता ८ जानेवारीला याबाबत आढावा बैठक शरद पवार यांनी घेतली.
यात नगर दक्षिणच्या जागेवर चर्चा झाली असून जिल्ह्यातील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचे सुपुत्र प्रतापराव ढाकणे यांच्यासह अजितदादा पवार यांच्या गटातील आमदार नीलेश लंके यांच्या नावावरही चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
विविध मतदार संघासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे आदींसह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी अहमदनगरसाठी आ. प्राजक्त तनपुरे हा नवीन व स्वच्छ चेहरा,
ओबीसी चेहरा असलेले प्रताप ढाकणे, आ. निलेश लंके या नावावर सकारात्मक चर्चा झाली. परंतु सद्यस्थितीत लंके हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबरोबर आहेत. त्यामुळे सरळ सरळ थेट त्यांचे नाव कुणी पुढे केलेनाही अशीही माहिती मिळाली आहे.
तिन्ही उमेदवार निवडणूक का लढवू शकतात? त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत?
– आ. निलेश लंके :
मोहटादेवी येथील शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभावेळी निलेश लंकेच्या पत्नी राणी लंके लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. खेड शिवापूर दौऱ्यावेळी स्वतः लंके यांनी वरिष्ठांनी तसेच पक्षाने संधी दिली तर मी काही पण लढायला तयार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तसेच कोरोना काळात केलेल्या कामामुळे ते लोकप्रिय आहेत.
– प्रतापराव ढाकणे :
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रतापराव ढाकणे हा एक ओबीसी चेहरा आहे. पाथर्डीसह जिल्हा राजकारणात त्यांचे नाव मोठे आहे. जनतेत उभे राहून संघर्ष करणारे नेते म्हणून ढाकणे यांची ओळख आहे. त्यामुळे हा देखील चेहरा व्यवस्थित आहे.
– आ. प्राजक्त तनपुरे :
२०१९ मध्ये विधानसभा लढवून जिंकली. सध्या ते आमदार आहेत. राज्यमंत्री पद मिळाल्याने जिल्हाभर कामाची चुणूक दाखवली. तनपुरे हे नाव चार दशकापासून राजकारणात आहे. राजकारणातील स्वच्छ चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.