७ जानेवारी २०२५ : ज्यांचे शहराच्या गटार योजनेच्या कामात योगदान नाही, त्यांना उद्घाटनाचे श्रेय देण्याचा प्रश्नच नाही.शहरातील भूमीगत गटार योजनेबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहेत.माझ्यासह आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत.शहरातील गटार योजना व पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यांची कामे केले जातील,असे स्पष्टीकरण आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिले आहे.
खासदार नीलेश लंके व अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या शहरातील भूमीगत गटार योजनेच्या कामावरील टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी पालिकेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांसह आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार पषिषद घेतली.या वेळी अभय आव्हाड, बंडुशेठ बोरुडे, नंदकुमार शेळके, मुकुंद गर्जे, सुभाषराव बर्डे, जमीर आतार, रामनाथ बंद, प्रविण राजगुरु, बजरंग घोडके, प्रसाद अग्रव्हाड, प्रशांत शेळके उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या, पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून शहरातील सांडपाणी व इतर पाणी एकाच ठिकाणी जमा करुन त्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे.ते पाणी शेतीसाठी विकून त्यातून उत्पन्न सुरु होईल त्या भूमीगत गटारीमध्ये पावसाचे पाणी जाणार नाही.पावसाच्या पाण्यासाठी सध्याची गटारे आहेत.सिमेंटची गटार योजना ते काम करील. विरोधक राजकीय हेतूने गटार योजनेवर टीका करीत आहेत.
पालिकेच्या ज्या कामात विरोधकांचे योगदान राहील, तेथे प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांना बोलविले जाईल. मात्र, तिथे त्यांचा काही संबंध नाही, त्या कामाचे त्यांना श्रेय देण्याचे कारण नाही. मी भूमीगत गटारीसाठी पाठपुरावा केला. २२४ कोटींची योजना मंजूर झाली.
तिचे टेंडर ऑनलाईन पद्धतीने होते. ते गुजरातमधील कंपनीला मिळाले. त्यावरून टीका करण्याचे कारण नाही. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर द्यावे, असे काही नाही, असे राजळे म्हणाल्या. मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी योजनेची तांत्रिक माहिती दिली.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीनिमित्त पालिकेत आयोजित कार्यक्रमात काही पत्रकारांचा सत्कार करण्यात आला नाही. याबाबत काही पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोट्यवधीची कामे प्रशासकांच्या काळात झाली. त्यांची चौकशी लावण्याचे खा. नीलेश लंके यांनी जाहीर केले. मात्र, त्याचे पुढे काय झाले, हे समजले नाही. ही चौकशी नेमकी कधी होणार,याची चर्चा पालिकेत सुरू होती.